IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:30 IST2025-09-25T13:28:50+5:302025-09-25T13:30:23+5:30
Shashi Tharoor: भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी आपले मत मांडले.

IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
भारतीय क्रिकेट संघाने २०२५ च्या आशिया कपमध्ये आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली आहे. भारताने काल बांगलादेशला पराभवाची धुळ चारून फायनलचे तिकीट मिळवले. आता बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील विजेता संघ अंतिम सामना २८ सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताशी भिडेल. त्यामुळे या स्पर्धेत तिसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये शेजारील देशाच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न केल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी आपले मत व्यक्त केले.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आशिया कपमध्ये भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याबद्दल थेट भाष्य केले. "मला वैयक्तिकरित्या असे वाटते की एकदा खेळण्याचा निर्णय घेतला गेला की, जर आपल्याला पाकिस्तानबद्दल इतका राग असेल तर आपण त्यांच्यासोबत खेळायला नको होते. पण जर आपण त्यांच्याशी खेळत आहोत, तर आपण खेळाच्या भावनेने खेळायला हवे होते आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करायला हवे होते", असे ते म्हणाले.
१९९९ मधील कारगिल युद्धाचा दाखला देताना शशी थरूर म्हणाले की, "१९९९ मध्ये कारगिल युद्ध सुरू असताना आपले सैनिक देशासाठी शहीद झाले. त्यावेळी भारत इंग्लंडमध्ये पाकिस्तानविरुद्ध विश्वचषक खेळत होता. तेव्हा भारतीय संघाने त्यांच्याशी हस्तांदोलन केले. कारण क्रीडाभावनेची भावना देशांमधील, सैन्यांमधील संघर्षाच्या भावनेपेक्षा वेगळी असते. हे माझे मत आहे." पाकिस्तानविरुद्धच्या भावना स्वाभाविक आहेत. परंतु, क्रीडाभावनेला राजकारण आणि लष्करी संघर्षांपासून वेगळे ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले.