"माझं म्हणणं ऐकूनच घेतलं नाही"; प्रियकराच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या ग्रीष्माची हायकोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 19:30 IST2025-02-06T19:29:00+5:302025-02-06T19:30:00+5:30
शेरॉन राज हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावलेल्या ग्रीष्माने हायकोर्टात धाव घेतली आहे.

"माझं म्हणणं ऐकूनच घेतलं नाही"; प्रियकराच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या ग्रीष्माची हायकोर्टात धाव
Sheron Raj Murder Case: केरळमध्ये प्रियकराला विष प्राशन करून ठार केल्याप्रकरणी दोषी ग्रीष्माने सत्र न्यायालयाच्या फाशीच्या निर्णयाला केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शेरोन राज हत्याकांडातील दोषी ग्रीष्माला केरळन्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. २३ वर्षीय शेरॉन राजला विष देऊन मारल्याप्रकरणी तिला दोषी ठरवण्यात आलं होतं. सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेबाबतच्या निर्णयात तथ्य, पुरावे आणि कायदा याकडे दुर्लक्ष केल्याचे दोषी ग्रीष्माने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. माझं म्हणणे निष्पक्षपणे ऐकून घेतले गेले नाही, असं ग्रीष्माने म्हटलं. या प्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने ग्रीष्माने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेबाबतचे सर्व पुरावे मागवले आहेत.
ग्रीष्माने दाखल केलेल्या अपीलावर केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी केरळ राज्याला नोटीस बजावली. २३ वर्षीय तिरुवनंतपुरम येथील रहिवासी शेरोन राजच्या हत्येप्रकरणी ग्रीष्माला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोषी आणि फाशीच्या शिक्षेला आव्हान देणाऱ्या ग्रीष्माच्या अपीलावर न्यायमूर्ती पीबी सुरेश कुमार आणि जॉबिन सेबॅस्टियन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ग्रीष्माच्या दोषी आणि फाशीच्या शिक्षेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर खंडपीठाने राज्याचा नोटीस बजावली. ग्रीष्माच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर राज्याला उत्तर देण्याचे निर्देशही दिले.
ग्रीष्मा ही मृत शेरॉन राजची प्रेयसी होती. तिला हे नाते संपवायचे होते म्हणून तिने विष पाजून त्याची हत्या केली. ग्रीष्माचा हा गुन्हा सिद्ध झाला होता. त्यानतंर १७ जानेवारी रोजी नेयट्टिनकारा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एएम बशीर यांनी त्याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. तिचा मामा निर्मला कुमारन नायर याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. तर त्याच्या आईची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
कोर्टाने आपल्या निकालात ग्रीष्माने रचलेल्या कटाबाबत भाष्य केलं. शेरॉनला विष देण्याचा तिचा पूर्वीचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यानंतर तिने पुन्हा एकदा औषधाच्या नावाखाली त्याला विष पाजलं. ज्यामुळे त्याचा वेदनादायक मृत्यू होईल हे तिला माहित होते. या सर्व कारणांमुळे तुरुंगात तिची सुधारण्याची शक्यता नाही असा निष्कर्ष न्यायाधीशांनी काढला होता.
मात्र आता ग्रीष्मा आणि तिचा मामा या दोघांनीही आता उच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांच्या शिक्षेला आव्हान दिले आहे. अपिलावर अंतिम निर्णय येईपर्यंत शिक्षेला स्थगिती देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. उच्च न्यायालयाने ग्रीष्माच्या मामाच्या तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे त्यामुळे तो सध्या जामिनावर सुटला आहे.