शरद पवार अनुत्सुक, विरोधक नव्या उमेदवाराच्या शाेधात; ममतांच्या बैठकीस डावे, आप व काँग्रेसही येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 08:10 IST2022-06-14T08:09:41+5:302022-06-14T08:10:07+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे राजधानी दिल्लीत पोहोचताच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराची निवड करण्याच्या हालचालींना वेग येणार आहे.

शरद पवार अनुत्सुक, विरोधक नव्या उमेदवाराच्या शाेधात; ममतांच्या बैठकीस डावे, आप व काँग्रेसही येणार
हरीश गुप्ता
नवी दिल्ली :
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे राजधानी दिल्लीत पोहोचताच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराची निवड करण्याच्या हालचालींना वेग येणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ जून रोजी आयोजित केलेल्या बैठकीला काँग्रेस, डावे, आम आदमी पार्टीसह सर्व विरोधी पक्ष उपस्थित राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र, शरद पवार हे निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या पार्श्वभूमीवर पवार यांनी नकार दिल्यास विरोधी पक्ष राष्ट्रपती पदाचा उमेदवार शोधत आहे.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार देण्याची शक्यता पडताळण्याबाबत ममता बॅनर्जी यांच्याशी बोलल्या आहेत. सूत्रांनुसार त्यांनी शरद पवार यांना विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार बनविण्याबाबतही आग्रह केला आहे. ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीत आम आदमी पार्टीही उपस्थित राहणार आहे. विरोधी पक्ष संयुक्त उमेदवार देण्याच्या तयारीत असून, पवारांना उमेदवारी देण्यास प्राधान्य देतील. त्यामुळे पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, ते राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
डावे पक्ष आज पवारांना भेटणार
सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आम्ही १५ जून रोजीच्या बैठकीला उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांच्यासोबतचे मतभेद मिटले का, असे विचारले असता, ते म्हणाले की, आम्ही विरोधी पक्षाच्या ऐक्यासाठी हे करीत आहोत. डावे पक्ष मंगळवारी शरद पवार यांची भेट घेणार असून, राष्ट्रपती पदाच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
...म्हणून पवार अनुत्सुक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने ओळख उघड न करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले की, पवार साहेब हे राजकारणात सक्रिय आहेत. सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा त्यांचा विचार नाही. ते राष्ट्रपती पदाचे उमेदवार नसतील. पराभवासाठी ते कधीच निवडणूक लढविणार नाहीत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे बहुमतासाठी १५०० मते कमी आहेत. बीजेडी, वायएसआर काँग्रेस, टीआरएस आणि अन्य छोट्या पक्षांच्या भूमिकेचा अंदाज नसल्याने पवार जोखीम घेणार नाहीत.