लज्जास्पद! जोडप्याने धर्म सांगायला नकार दिल्याने तरूणाची बस स्टॉपवर उतरवली पॅन्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 10:48 IST2017-11-06T10:45:46+5:302017-11-06T10:48:03+5:30
हरियाणाच्या रेवाडीमध्ये एका दाम्पत्याला सगळ्यांसमोर लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं.

लज्जास्पद! जोडप्याने धर्म सांगायला नकार दिल्याने तरूणाची बस स्टॉपवर उतरवली पॅन्ट
चंदीगड- हरियाणाच्या रेवाडीमध्ये एका दाम्पत्याला सगळ्यांसमोर लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं. रेवाडीमधील स्थानिक धार्मिक संघटनेच्या लोकांनी या जोडप्याचा धर्म जाणून घेण्यासाठी त्याला आधी मारहाण केली. पण तरूणाने धर्म सांगायला नकार दिल्याने त्या तरूणाची सगळ्यांसमोर बस स्टॉपवर पॅन्ट उतरवली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
संघटनेच्या लोकांनी त्या तरूणाला धमकावल्याचाही आरोप होतो आहे. दाम्पत्याला धमकावल्यानंतर त्यांच्यावर त्यांचा धर्म सांगण्यासाठी दबाव टाकण्यात आला. पीडित तरूण-तरूणी हे वेगवेगळ्या धर्माचे असून कुटुंबीयांचा विरोध असताना त्यांनी लग्न केलं, असं बोललं जातं आहे. त्यानंतर ते धार्मिक संघटनांच्या निशाण्यावर आले आहेत.
कट्टरपंथियांकडून धमकावलं गेल्यानंतर त्यांनी याप्रकरणाची पोलीसात तक्रारही केली. ते दोघेही 10 महिन्यापासून रेवाडीमध्ये राहत असून ही घटना 10 ऑक्टोबर रोजी घडली आहे.
या दाम्पत्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या संघटनेच्या लोकांना चौकशीसाठी बोलावलं होतं. बस स्टॉपवर सगळ्यांसमोर संघटनेच्या लोकांनी आमच्यावर धर्म सांगण्यासाठी दबाव टाकला, असा आरोप त्या जोडप्याने पोलीस स्टेशनमध्ये केला. धर्म सांगायला नकार दिल्यानंतर संघटनेच्या लोकांनी मारहाण केली, असा आरोपही त्या तरूणाने केला.
या प्रकरणी धार्मिक संघटनेच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित दाम्पत्याने केली आहे.