'अध्यक्ष महोदय' तुमची लाज वाटते, प्रकाश राज यांची सटकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 13:43 IST2019-02-13T13:41:59+5:302019-02-13T13:43:30+5:30
काँग्रेसमधला कोणी सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान बनायचा विचार करू शकतो का ?, असा प्रश्नही अमित शाहांनी उपस्थित केला आहे.

'अध्यक्ष महोदय' तुमची लाज वाटते, प्रकाश राज यांची सटकली
मुंबई - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी पुन्हा एकदा गांधी घराण्यावर निशाणा साधताना राहुल यांना लक्ष्य केलं होतं. मात्र, भाजपाध्यक्षांच्या या टीकेला जयकांत शिक्रे फेम अभिनेता प्रकाश राज यांनी उत्तर दिलं आहे. अध्यक्ष महोदय, आपण पातळी सोडली असं ट्विट करुन प्रकाश राज यांनी अमित शहांवर नाव न घेता टीका केली. प्रकाश राज यांनी टीका करताना अमित शहांच्या वक्तव्यासंदर्भातील बातमी शेअर केली आहे.
भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधींवर टीका करताना, कौटुंबीक मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदाची जागा ही जन्मापासूनच आरक्षित आहे. राहुल गांधींवर टीका करताना अमित शाह म्हणाले, राहुल गांधींनी लग्न न केल्यामुळेच प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात आल्या. गुजरातमधल्या गोध्रा येथे सभेला संबोधित करताना त्यांनी अशा पद्धतीने टीका केली होती.
काँग्रेसमधला कोणी सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान बनायचा विचार करू शकतो का ?, असा प्रश्नही अमित शाहांनी उपस्थित केला आहे. अमित शाह म्हणाले- राहुल गांधींचं लग्न झालेलं नाही. त्यामुळे आता प्रियंका गांधी राजकारणात आल्या आहेत. तसेच ते म्हणाले, भाजपामध्ये एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. परंतु काँग्रेसमध्ये तसं कधीही होणार नाही. तर मी भाजपाचा एक बूथ कार्यकर्ता होतो. आता पक्षाचा अध्यक्ष झालो आहे, असेही शहा यांनी म्हटले होते.
अमित शहांच्या या टीकेवरुन दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांनी भाजपाध्यक्षांना सुनावले आहे. मला तुमची लाज वाटते मि. प्रेसिंडेंट ऑफ पॉलिटीकल पार्टी. तुम्ही किती अविचारी बनलात, तुमची पातळी किती खालावली, तुमचा आवाका किती खालच्या स्तराला गेलाय, याची मला लाज वाटते, असे प्रकाश राज यांनी म्हटले. तसेच राज यांनी याबाबत अमित शहांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधीवर केलेल्या टीकेसंदर्भातील बातमीही शेअर केली आहे.
https://t.co/47pHuwKthL ...SHAME on you Mr..President of a political party.....how DESPERATE are you ...how LOW will you stoop down..how LOW is your BELT... #justasking
— Prakash Raj (@prakashraaj) February 12, 2019