पश्चिम महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया

By Admin | Updated: August 11, 2015 22:11 IST2015-08-11T22:11:37+5:302015-08-11T22:11:37+5:30

Shadow of drought on Western Maharashtra | पश्चिम महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया

पश्चिम महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया

>५२ टक्केच पाऊस : विभागात ६० हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र वाया

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा उजाडल्यानंतरही अजून समाधानकारक पाऊस न पडल्याने पश्चिम महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया पसरली आहे. पावसाअभावी पुणे विभागातील तब्बल ६० हजार हेक्टरवरील खरिपाचे क्षेत्र वाया गेले आहे.
वेळ निघून गेल्याने येथे दुबार पेरणीसुद्धा शक्य होणार नसल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यातच दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचे संकट गंभीर होत असून, मंगळवारअखेर १ लाख ८९ हजार लोकांना ८५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
विभागात जून आणि जुलै महिन्याच्या सरासरीच्या केवळ ५२ टक्केच पाऊस झाला असून, पुण्यासह सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती चिंताजनक आहे. विभागातील चार जिल्ह्यांमधील काही तालुक्यांमध्ये जुलै महिन्यात पावसाचा थेंबही पडलेला नाही. त्यामुळे या जिल्ह्यांतील स्थिती चिंताजनक बनली आहे.
ऑगस्ट महिना उजाडल्याने आता दुबार पेरणी करणे शक्य नसल्याचे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रात जून महिन्यात सुरुवातीला चांगल्या पावसाने हजेरी लावली, पण त्यानंतर संपूर्ण जुलै महिना व ऑगस्टचे पंधरा दिवस कोरडे गेले आहेत.
---
धरणांची स्थिती चिंताजनक
पश्चिम महाराष्ट्रातील भीमा व कृष्णा खोर्‍यातील धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. सरासरी पाणीसाठा केवळ ५८ टक्के इतकाच झाला आहे. मागील काही वर्षांत १५ ऑगस्टपर्यंत बहुतेक सर्व धरणे शंभर टक्के भरतात. परंतु यंदा धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला प्रकल्पात केवळ ५१.४८ टक्के पाणीसाठा आहे. नीरा खोरे ६० टक्के, कुकडी खोर्‍यात केवळ ३४ टक्केच पाणीसाठा आहे. उजनी खोर्‍यात ४१ टक्के साठा आहे.
------------------------------------------------------
टँकरची स्थिती
जिल्हाटँकरगावे-वाड्या बाधित लोकसंख्या
पुणे २०१०-१३७ ४०,६५७
सातारा२७३४-१५५ ५३,९३३
सांगली३०२९-१९२ ७८,७१३
सोलापूर८८ १६,६८६
कोल्हापूर०० ०
----------------------------------------------------
एकूण ८५८१-४८४ १,८९,९८९

Web Title: Shadow of drought on Western Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.