टॉप कंपन्यांमध्ये वाढला महिलांचा लैंगिक छळ, सर्वाधिक तक्रारी बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 06:27 IST2024-08-22T06:27:06+5:302024-08-22T06:27:36+5:30
वित्त वर्ष २०२४ मध्ये आदल्या वर्षाच्या तुलनेत लैंगिक छळाच्या २६८ अधिक घटनांची नोंद झाली.

टॉप कंपन्यांमध्ये वाढला महिलांचा लैंगिक छळ, सर्वाधिक तक्रारी बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात
नवी दिल्ली : देशातील आघाडीच्या कंपन्यांत वित्त वर्ष २०२४ मध्ये लैंगिक छळाच्या घटनांत ४० टक्के वाढ झाली आहे. हा कॉर्पाेरेट पारदर्शकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा बदल असल्याचे मानले जात आहे.
वित्त वर्ष २०२४ मध्ये आदल्या वर्षाच्या तुलनेत लैंगिक छळाच्या २६८ अधिक घटनांची नोंद झाली. हे प्रमाण आदल्या वर्षाच्या तुलनेत ४०.४ टक्के अधिक आहे. मुंबई शेअर बाजाराच्या बीएसईमधील ३० कंपन्यांत एकूण ९३२ तक्रारी दाखल झाल्या. आदल्या वर्षी हा आकडा ६६४ इतका होता. लैंगिक छळाच्या सर्वाधिक तक्रारी बँकिंग व तंत्रज्ञान क्षेत्रातून आल्या आहेत.
९३२ तक्रारी मुंबई शेअर बाजाराच्या बीएसईमधील ३० कंपन्यांत दाखल झाल्या आहेत.
६६४ लैंगिक छळाच्या तक्रारी २०२३ मध्ये बीएसईमधील ३० कंपन्यांत दाखल झाल्या होत्या.
९७% कंपन्यांना लैंगिक छळ कायद्याची माहिती नाही.
३६% भारतीय कंपन्या लैंगिक छळ कायद्याचे पालन करीत नाहीत.
२५% आंतरराष्ट्रीय कंपन्या लैंगिक छळ कायद्याचे पालन करीत नाहीत.
२४% महिला सध्या कंपन्यांमध्ये काम करतात.
तक्रारी किती वाढल्या ?
आस्थापना २०२४ २०२३
१. आयसीआयसीआय बँक १३३ (४३)
२. टीसीएस ११० (४९)
३. इन्फोसिस ९८ (७८)
४. टेक महिंद्रा ९३ (७४)
५. एचडीएफसी बँक ७७ (६८)
६. ॲक्सिस बँक ३६ (३४)
७. टाटा स्टील २१ (३८)
अहवाल : ‘कम्पलायकरो’ या संस्थेने जारी केलेल्या एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
‘पोश’मुळे जागरूकता वाढली
महिला लैंगिक छळ प्रतिबंधक (पोश) कायद्याबाबत जागरूकता वाढली आहे. तसेच कंपन्यांनीही अशा घटनांच्या नाेंदणीसाठी पीडितांना प्रोत्साहित करण्याचे धोरण स्वीकारल्याने तक्रारींत वाढ झाली आहे.