शिक्षकाकडून लैंगिक छळ, विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 05:54 IST2025-07-14T05:54:49+5:302025-07-14T05:54:58+5:30
२० वर्षीय तरुणी ९५ टक्के भाजली, प्रकृती गंभीर

शिक्षकाकडून लैंगिक छळ, विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवले
भुवनेश्वर : ओडिशाच्या बालासोर येथील महाविद्यालय परिसरात लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या २० वर्षीय तरुणीने स्वत:ला पेटवून घेतल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ९५ टक्के भाजलेल्या विद्यार्थिनीवर भुवनेश्वरच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे.
पीडित विद्यार्थिनी बालासोर येथील फकीर मोहन महाविद्यालयातील बी.एड्. अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. लैंगिक अत्याचार व मानसिक छळ करणाऱ्या प्राध्यापकाविरोधात कारवाईची मागणी करत शनिवारी विद्यार्थिनीने पेटवून दिले. त्यानंतर तिला उपचारासाठी एम्स अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, ९५ टक्के भाजल्याने पीडितेच्या फुफ्फुसे व मूत्रपिंडांवरदेखील परिणाम झाला आहे. तिच्या संपूर्ण शरीरावर भाजल्याच्या जखमा असल्याची माहिती एम्सचे संचालक डॉ. अशुतोष बिस्वास यांनी दिली.
उपचारासाठी समिती स्थापन
विद्यार्थिनीवर उपचार करण्यासाठी ॲनेस्थेसिया, फुफ्फुसरोग, प्लास्टिक सर्जरी, मूत्रपिंडरोग आणि इतर विभागांतील डॉक्टरांचा समावेश असलेल्या ८ सदस्यीय तज्ज्ञांच्या समितीची स्थापना केली आहे, तसेच आवश्यकता भासल्यास इतर विभागांतील तज्ज्ञांचाही या समितीत समावेश केला जाणार आहे.
प्राध्यापकाला अटक : ओडिशा सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कर्तव्यात कसूर करणाऱ्या महाविद्यालयाच्या प्राचार्याला निलंबित केले आहे. पीडित मुलीने छळाचा आरोप केलेला प्रा. समीर कुमार साहू याला पोलिसांनी अटक केली आहे.