भयंकर ‘मोन्था’ चक्रीवादळाची आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर जोरदार हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 07:41 IST2025-10-28T07:41:00+5:302025-10-28T07:41:24+5:30
मंगळवारी सकाळनंतर हे वादळ आक्राळविक्राळ रूप धारण करू शकते.

भयंकर ‘मोन्था’ चक्रीवादळाची आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर जोरदार हजेरी
कोलकाता / अमरावती : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता भयंकर अशा ‘मोन्था’ चक्रीवादळात रुपांतरीत झाले असून, आंध्र प्रदेश किनारपट्टीवर या वादळाने हजेरी लावली आहे. याच्या परिणामी होणाऱ्या संभाव्य वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश, ओडिशा आणि प. बंगालमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, ओडिशाच्या दक्षिण भागातून अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे.
मंगळवारी सकाळनंतर हे वादळ आक्राळविक्राळ रूप धारण करू शकते. या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशात अनेक जिल्ह्यात शाळांना सुटी देण्यात आली आहे. बंगालमध्ये मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
१५ किमी ताशी वेगाने वादळाची वाटचाल
१०० ते ११० किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
३० ऑक्टोबरपर्यंत पाच राज्यांत मुसळधार पाऊस
या राज्यांत पाऊस
मोन्था वादळाच्या परिणामी कर्नाटक, केरळ, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि प. बंगालमध्ये मुसळधार वादळी पाऊस होण्याची शक्यता पाहता राज्यांतील प्रशासन सतर्क झाले आहे. दार्जिलिंग, कलिम्पोंगच्या डोंगरी भागात भूस्खलन, सखल पठारी भागात पाणी भरले जाण्याच्या शक्यतेने यंत्रणा सज्ज आहेत.
४३ रेल्वे गाड्या रद्द
आंध्र किनारपट्टीलगत मार्गावरून जाणाऱ्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या असून, वादळाच्या प्रभाव क्षेत्रातील मार्गांवर अशा एकूण ४३ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांची मुख्यमंत्री नायडूंशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी ‘मोन्था’ वादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली. वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा व यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. दरम्यान, नायडू यांनी अधिकाऱ्यांच्या एका बैठकीत स्थितीचा आढावा घेतला.