आंदोलक शेतकऱ्यांशी आज चर्चेची सातवी फेरी; कृषी कायद्यांच्या तोडग्याकडे सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 12:04 AM2020-12-30T00:04:01+5:302020-12-30T06:54:59+5:30

४० शेतकरी संघटनांच्या प्रमुखांना चर्चेसाठी केले निमंत्रित

The seventh round of talks with the agitating farmers today | आंदोलक शेतकऱ्यांशी आज चर्चेची सातवी फेरी; कृषी कायद्यांच्या तोडग्याकडे सर्वांचे लक्ष

आंदोलक शेतकऱ्यांशी आज चर्चेची सातवी फेरी; कृषी कायद्यांच्या तोडग्याकडे सर्वांचे लक्ष

Next

- विकास झाडे

नवी दिल्ली : शेतीविषयक कायदे रद्द करण्याच्या मागणीचा आग्रह धरणाऱ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी आज, बुधवारी केंद्रीय मंत्रिगटाची सातव्यांदा बैठक होणार आहे. या बैठकीत कृषी कायद्यांविषयी काय तोडगा निघतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली.

कृषी मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल यांनी ४० शेतकरी संघटनांच्या प्रमुखांना पत्र लिहून ३० डिसेंबरच्या बैठकीसाठी बोलावले आहे. या सर्व शेतकरी संघटना संयुक्त किसान मोर्चाच्या फलकाखाली सरकारशी चर्चा करीत आहेत. सरकारने कायदे मागे घेतले तर आम्ही लगेच दिल्लीच्या सर्व सीमा मोकळ्या करून देऊ, असे आश्वासन शेतकरी नेत्यांनी दिले आहे. 

शरद पवार यांनी घेतला आढावा

राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकर दरेकर आणि संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी मंगळवारी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची ६, जनपथ येथील निवासस्थानी भेट घेतली. महिनाभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन व सरकारसोबत झालेल्या बैठकांचा पवार यांनी आढावा घेतला. बुधवारी बैठक झाल्यानंतर पवार अन्य नेत्यांशी बोलून संयुक्त पुरोगामी आघाडीची ‘यूपीए’ आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. महाराष्ट्रातून जवळपास १ हजार शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय कशी आहे याबाबतही पवारांनी आस्थेने विचारपूस केली.

केरळमधील शेतकऱ्यांनी पाठविले १६ टन अननस

कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे सुरू असलेल्या आंदोलनाला महिना उलटून गेला आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळू लागला आहे. आता केरळमधील अननस उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनकर्त्यांसाठी मोफत अननस पाठविले आहे. 

''पायनापल सिटी'' म्हणून मधुर अननसासाठी प्रसिद्ध असलेल्या एर्नाकुलम जिल्ह्यातील वाझाकुलम या ठिकाणाहून गुरुवारी रात्री १६ टन अननसाचे ट्रक दिल्लीला पाठविण्यात आले. केरळचे कृषिमंत्री व्ही.एस. सुनील कुमार यांच्या हस्ते हे ट्रक आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी रवाना करण्यात आले.  दिल्लीतील केरळचे खासदार हे अननस आंदोलनस्थळी वाटणार आहेत. केरळच्या शेतकऱ्यांच्या या उपक्रमाचे सोशल मीडियावरही कौतुक होत आहे. सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केरळच्या शेतकरी बांधवांनी पाठविलेली ही भेट मोहक आणि मधुर ठरावी, अशा भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. 

 

Web Title: The seventh round of talks with the agitating farmers today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.