भुकेले जीव, रुग्णांसाठी धावून आले ‘सेवा किचन’, खुशरू पोचा यांची देशभरात मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 09:14 AM2021-05-25T09:14:13+5:302021-05-25T09:15:34+5:30

खुशरू पोचा नामक देवदूताने गरजू नागरिकांना रेशन आणि कोरोनाच्या रुग्णांसाठी ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिल्यामुळे समाजात माणुसकी अजून जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे.

‘Seva Kitchen’ rushed for patients & Hungry people, Khushru Pocha helped across the country | भुकेले जीव, रुग्णांसाठी धावून आले ‘सेवा किचन’, खुशरू पोचा यांची देशभरात मदत

भुकेले जीव, रुग्णांसाठी धावून आले ‘सेवा किचन’, खुशरू पोचा यांची देशभरात मदत

Next

नागपूर : भुकेल्या व्यक्तीच्या पोटात दोन घास जावेत यासाठी धडपड करतो, तो खरा माणूस. कोरोनामुळे आधीच नागरिकांचा रोजगार हिरावला गेल्यामुळे त्यांना दोन वेळच्या भोजनासाठी धडपड करावी लागत आहे. अशा स्थितीत खुशरू पोचा नामक देवदूताने गरजू नागरिकांना रेशन आणि कोरोनाच्या रुग्णांसाठी ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिल्यामुळे समाजात माणुसकी अजून जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे.
खुशरू पोचा हे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मुख्य कार्यालय अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. सेवा किचन या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून ते समाजसेवा करीत आहेत. त्यांच्या संस्थेची कुठेही नोंदणी झालेली नाही. समाजकार्य करताना ते कधीच कुणाकडून आर्थिक मदत घेत नाहीत. समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या मदतीवर ते गरजू नागरिकांना मदत करतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांचा रोजगार हिरावला. अशा बिकट परिस्थितीत खुशरू पोचा यांनी गरजू नागरिकांना सातत्याने भोजन व रेशन किट पुरविल्या. दुसऱ्या लाटेतही त्यांचे कार्य थांबलेले नाही. नुकतेच त्यांनी मेळघाटमध्ये ४ आणि यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे २, असे ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठविले आहेत. गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी त्यांनी १५ किलोच्या रेशन किट तयार केल्या आहेत. त्यात पीठ, तांदूळ, डाळ, चहा, मसाले, लोणचे, तेल आदी वस्तूंचा समावेश आहे. अशा २५०० किट त्यांनी पांढरकवडा येथे पाठविल्या आहेत, तर गुजरातच्या अमरेली गावात ५०० किट, कोकणातील मालवण येथे २०० किट पाठवून गरिबांच्या चुली पेटविण्यास मदत केली आहे. 
नागपुरातही पॉझिटिव्ह असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ते दोन वेळचे भोजन पुरवीत आहेत, तसेच मेडिकलमध्ये दररोज १०० रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था ते करीत आहेत. 

देशातील २० रुग्णालयांत मदत
खुशरू पोचा हे सेवा किचनच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून देशातील २० हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना भोजन पुरवीत आहेत. यात हैदराबाद, बंगळुरू, नवा रायपूर, नवी मुंबई, ठाणे, नवी दिल्ली आणि नागपूर येथील रुग्णालयांचा समावेश आहे. 

हमाल बांधवांना आधार
लॉकडाऊनमुळे रेल्वेगाड्या ठप्प झाल्याने हमाल बांधवांचा रोजगार बुडाला. पोचा यांनी त्यांना महिनाभराचे रेशन देऊन जगण्यासाठी आधार दिला. आता रेल्वेगाड्या सुरू झाल्या; परंतु भीतीमुळे प्रवासी हमाल बांधवांना काम देण्याचे टाळत आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. अशा कठीण परिस्थितीत पोचा हे सध्या हमाल बांधवांना महिनाभराचे रेशन पुरवित आहेत.

Web Title: ‘Seva Kitchen’ rushed for patients & Hungry people, Khushru Pocha helped across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.