Corona Vaccine: दिलासा! सीरम आणि भारत बायोटेकने कंबर कसली; महिन्याला १७.८ कोटी लसींचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 10:57 AM2021-05-13T10:57:15+5:302021-05-13T11:03:49+5:30

Corona Vaccine: भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटने दिलासादायक निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

serum institute and bharat biotech promises to increase corona vaccine production | Corona Vaccine: दिलासा! सीरम आणि भारत बायोटेकने कंबर कसली; महिन्याला १७.८ कोटी लसींचे उत्पादन

Corona Vaccine: दिलासा! सीरम आणि भारत बायोटेकने कंबर कसली; महिन्याला १७.८ कोटी लसींचे उत्पादन

Next
ठळक मुद्देसीरम आणि भारत बायोटेकने कंबर कसलीभारत बायोटेक वाढवणार लसींचे उत्पादनसीरम इन्स्टिट्यूट १० कोटी लसी तयार करणार

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाची परिस्थिती अधिकाधिक बिकट होताना पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू नवीन उच्चांक गाठताना दिसत आहेत. कोरोनावरील नियंत्रणासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. मात्र, कोरोना लसींचा होत असलेला तुटवडा चिंतेत भर टाकणारा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटने दिलासादायक निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही कंपन्यांनी महिन्याला १७.८ कोटी कोरोना लसी तयार करण्यासाठी कंबर कसली आहे. (serum institute and bharat biotech promises to increase corona vaccine production)

हैदराबाद स्थित भारत बायोटेक स्वदेशी कोव्हॅक्सिन लसींचे उत्पादन करत आहे. तर पुण्यात ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनेकाच्या कोरोना लसींचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करत आहे. देशातील कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. लसींच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही कंपन्यांना केंद्र सरकारने जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात किती लसींचे उत्पादन करण्याची योजना आहे, अशी विचारणा केली आहे.

SII: जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूटची कमाई किती?

भारत बायोटेक वाढवणार लसींचे उत्पादन

भारत बायोटेकचे व्यवस्थापक डॉ. व्ही. कृष्ण मोहन यांनी सरकारला दिलेल्या माहितीनुसार, भारत बायोटेकचे जुलै महिन्यात ३.३२ कोटी लसींचे उत्पादन करणार असून, ऑगस्ट महिन्यात कोरोना लसीचे उत्पादन ७.८२ कोटींपर्यंत वाढवणार असल्याचे सांगितले. तसेच सप्टेंबर महिन्यात हे उत्पादन कायम राहील, असे आश्वसान देण्यात आले आहे. 

सीरम इन्स्टिट्यूट १० कोटी लसी तयार करणार

भारत बायोटेकप्रमाणे सीरम इन्स्टिट्यूटनेही लसींचे उत्पादन वाढवण्याची ग्वाही दिली आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन १० कोटींपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूटमधील सरकारी तसेच नियामक व्यवस्थापक प्रकाश कुमार सिंह यांनी दिली. सप्टेंबर महिन्यात हीच गती कायम राखली जाईल, असेही सांगितले जात आहे. 

आता भारतात होणार जॉन्सन अँड जॉन्सन लसीचं उत्पादन!; चाचपणी सुरू

लसींसाठी जागतिक निविदा

महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आणि तेलंगण यांसह काही राज्यांनी कोरोना लसींसाठी जागतिक निविदा काढण्याचा पर्याय स्वीकारला आहे. कोरोना लसींच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. फार्मास्युटिकल्स विभागाचे संयुक्त सचिव रजनीश तिंगल, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ. मनदीप भंडारी यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी एप्रिल महिन्यात सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक कंपन्यांना भेटी देऊन लसींचे उत्पादन आणि क्षमता यांचा आढावा घेतल्याची माहिती मिळाली आहे. 

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ४१२० जण मृत्युमुखी पडले आहेत. याच कालावधीत आणखी ३,६२,७२७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या २,३७,०३,६६५ झाली आहे. देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ३७ लाख १० हजार ५२५ इतकी आहे. देशामध्ये एकूण १७ कोटी ७२ लाख १४ हजार २५६ जणांचं लसीकरण करण्यात आले आहे. 
 

Web Title: serum institute and bharat biotech promises to increase corona vaccine production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.