भारतातील फेसबूक, व्हॉट्सअॅपवर भाजपा आणि संघाचे नियंत्रण, राहुल गांधींचा सनसनाटी आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 20:50 IST2020-08-16T20:45:36+5:302020-08-16T20:50:45+5:30
भारतामध्ये फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नियंत्रण मिळवले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी एका परदेशी वृत्तपत्रातील लेखाचा संदर्भ देऊन केला आहे.

भारतातील फेसबूक, व्हॉट्सअॅपवर भाजपा आणि संघाचे नियंत्रण, राहुल गांधींचा सनसनाटी आरोप
नवी दिल्ली - कोरोना विषाणू, चीनची घुसखोरी, देशाची अर्थव्यवस्था यावरून घणाघाती सवाल करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मोदी सरकारची कोंडी केली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी आज भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अजून एक सनसनाटी आरोप केला आहे. भारतामध्ये फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नियंत्रण मिळवले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी एका परदेशी वृत्तपत्रातील लेखाचा संदर्भ देऊन केला आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्विट करून भाजपा आणि संघावर हा सनसनाटी आरोप केला आहे. त्यात राहुल गांधी म्हणाले की, भारतात फेसबूक आणि व्हॉट्अॅपवर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कब्जा केला आहे. त्या माध्यमातून ते फेक न्यूज आणि द्वेष पसरवत आहेत. तसेच निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठीही त्याचा वापर त्यांच्याकडून होतो. अखेरीस अमेरिकन प्रसारमाध्यमामधून फेसबूकबाबतचे सत्य समोर आले, असा दावा त्यांनी वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्रातील लेखाच्या हवाल्याने केला.
भाजपा-RSS भारत में फेसबुक और व्हाट्सएप का नियंत्रण करती हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 16, 2020
इस माध्यम से ये झूठी खबरें व नफ़रत फैलाकर वोटरों को फुसलाते हैं।
आख़िरकार, अमेरिकी मीडिया ने फेसबुक का सच सामने लाया है। pic.twitter.com/PAT6zRamEb
भारतातील सत्ताधारी भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून होणारी द्वेषपूर्ण भाषा आणि आक्षेपार्ह वक्तव्यांबाबत फेसबूककडून मवाळ भूमिका घेतली जाते, असे वॉल स्ट्रीट जर्नलमधील लेखात म्हटले होते. तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केल्यास कंपनीच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, असेही एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने या लेखात म्हटले होते.
दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या या आरोपांना भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधींच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना रविशंकर प्रसाद म्हणाले की, निवडणुकीपूर्वी डेटाला हत्यार बनवताना राहुल गांधीच रंगेहात पकडले गेले होते. केंब्रिज अॅनॅलिटिका, फेसबूकशी असलेली भागिदारी पकडी गेली होती, असे लोक आज बेशरमपणे प्रश्न विचारत आहेत.