“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 16:47 IST2025-12-20T16:46:52+5:302025-12-20T16:47:10+5:30
Sonia Gandhi ON MGNREGA: मनरेगा कायदा कमकुवत करून मोदी सरकारने लाखो शेतकरी, कामगार आणि भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला केला, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.

“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Sonia Gandhi ON MGNREGA: २० वर्षे जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) म्हणजेच व्हीबी-जी राम जी) हे नवे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकावरील चर्चेला कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हे सभागृहात उत्तर देत असताना विरोधकांनी गदारोळ माजविला. विरोधकांनी या विधेयकाचे कागद फाडून ते सभागृहात भिरकावले. या घटनेनंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. यानंतर आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट शेअर करत सोनिया गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मला अजूनही आठवते की, २० वर्षांपूर्वी जेव्हा डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तेव्हा संसदेत मनरेगा कायदा एकमताने मंजूर झाला होता. हे एक क्रांतिकारी पाऊल होते, ज्याचा फायदा लाखो ग्रामीण कुटुंबांना झाला. विशेषतः वंचित, शोषित, गरीब आणि अत्यंत गरीब लोकांसाठी मनरेगा कायदा उपजीविकेचे साधन बनला. रोजगाराच्या शोधात आपल्या जन्मभूमि, गाव, घर आणि कुटुंबातून स्थलांतर रोखणे शक्य झाले. रोजगाराचे कायदेशीर अधिकार देण्यात आले आणि ग्रामपंचायतींना अधिकार देण्यात आले. मनरेगाच्या माध्यमातून, महात्मा गांधींच्या भारतातील ग्राम स्वराजच्या स्वप्नाकडे एक ठोस पाऊल उचलण्यात आले, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारने मनरेगा कमकुवत करण्याचा प्रयत्न केला
गेल्या ११ वर्षात मोदी सरकारने ग्रामीण भागातील बेरोजगार, गरीब आणि वंचित लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून मनरेगा कमकुवत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे, तर कोरोना काळात मनरेगा योजना गरीब वर्गासाठी संजीवनी ठरली. पण सरकारने अलिकडेच मनरेगा योजनेवर बुलडोझर चालवला, हे अत्यंत खेदजनक आहे. केवळ महात्मा गांधींचे नाव वगळण्यात आले नाही, तर चर्चा न करता, सल्लामसलत न करता, विरोधी पक्षांना विश्वासात न घेता मनरेगाचे स्वरूप मनमानी पद्धतीने अनियंत्रितपणे बदलण्यात आले, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.
मनरेगाच्या निर्मिती, अंमलबजावणीत काँग्रेसची महत्त्वाची भूमिका
आता कोणाला रोजगार मिळेल, किती, कुठे आणि कोणत्या पद्धतीने मिळेल, हे प्रत्यक्षात न पाहता दिल्लीत बसलेले सरकार ठरवेल. मनरेगाच्या निर्मिती आणि अंमलबजावणीत काँग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु, हा कधीही पक्षाचा मुद्दा नव्हता. ही एक अशी योजना होती, जी राष्ट्रीय आणि सार्वजनिक हिताची सेवा करते. हा कायदा कमकुवत करून, मोदी सरकारने लाखो शेतकरी, कामगार आणि भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला केला आहे, या शब्दांत सोनिया गांधी यांनी टीका केली.
दरम्यान, याचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत. २० वर्षांपूर्वी, मी माझ्या गरीब बंधू आणि भगिनींसाठी रोजगार हक्क मिळवण्यासाठी लढा दिला होता. आजही, मी या कठोर कायद्याविरुद्ध लढण्यासाठी वचनबद्ध आहे. माझ्यासारखे सर्व काँग्रेस नेते आणि लाखो कार्यकर्ते तुमच्यासोबत उभे आहेत. जय हिंद, असे सोनिया गांधी यांनी एक्सवरील व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.
भाई और बहनों.. नमस्कार
मुझे आज भी याद है, 20 साल पहले डॉ. मनमोहन सिंह जी प्रधानमंत्री थे, तब संसद में मनरेगा कानून आम राय से पास किया गया था। यह ऐसा क्रांतिकारी कदम था, जिसका फायदा करोड़ों ग्रामीण परिवारों को मिला था। खासतौर पर वंचित, शोषित, गरीब और अतिगरीब लोगों के लिए… pic.twitter.com/mjH4CfYRVe— Congress (@INCIndia) December 20, 2025