काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कर्ण सिंह यांचा कलम ३७० हटवण्यास पाठिंबा, म्हणाले निर्णयाला विरोध करणे चुकीचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 17:50 IST2019-08-08T17:49:22+5:302019-08-08T17:50:28+5:30
कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत काँग्रेसमध्ये दुमत निर्माण झाल्याचे चित्र दिसत असून, अनेक काँग्रेस नेते पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात मतप्रदर्शन करत आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कर्ण सिंह यांचा कलम ३७० हटवण्यास पाठिंबा, म्हणाले निर्णयाला विरोध करणे चुकीचे
नवी दिल्ली - कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत काँग्रेसमध्ये दुमत निर्माण झाल्याचे चित्र दिसत असून, अनेक काँग्रेस नेते पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात मतप्रदर्शन करत आहेत. दरम्यान, काश्मिरच्या भारतातील विनीकरणावर स्वाक्षरी करणारे राजा हरी सिंह यांचे पुत्र आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कर्ण सिंह यांनी कलम ३७० बाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला समर्थन दिले आहे. या निर्णयासाठी केंद्र सरकारवर पूर्णपणे टीका करणे योग्य ठरणार नाही, असे कर्ण सिंह यांनी म्हटले आहे.
कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाबाबत भाष्य करताना कर्ण सिंह म्हणाले की, ''या निर्णयाला सरसकट चुकीचा ठरवणे योग्य ठरणार नाही. या निर्णयामध्ये अनेक सकारात्मक पैलू आहेत. संसदेत अगदी वेगवान हालचाली करून घेतलेल्या निर्णयामुळे आम्हा सर्वांना धक्का बसला आहे.''
या निर्णयाबाबत देशभरामधून उमटत असलेल्या प्रतिक्रियांबाबत ते म्हणाले की,''केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाला जम्मू आणि लडाखसह संपूर्ण देशभरातून पाठिंबा मिळाला आहे. मी या परिस्थितीबाबत खूप विचार केला आहे. वैयक्तिक पातळीवर मी या निर्णयाला पूर्णपणे विरोध करण्याशी सहमत नाही. यामध्ये अनेक सकारात्मक पैलू आहेत. लडाखला केंद्रशासित करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. खरंतर काश्मीर रियासतीचा सदर ए रियासत असताना १९६५ मध्ये मी हा सल्ला दिला होता.''
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्यासंदर्भातील कलम ३७० मधील अनेक तरतुदी संपुष्टात आणल्या आहेत.तसेच जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन करूव जम्मू -काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याचे विधेयकही संसदेत मंजूर झाले आहे.