जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये तीन ते चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले असून जोरदार चकमक सुरु आहे. पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्याची मोहिम वेगाने सुरु आहे. ऑपरेशन सिंदूर थांबल्यानंतर सैन्याने जम्मू, काश्मीर भागात लपलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यास सुरुवात केली आहे. यात आतापर्यंत सहा दहशतवादी मारले गेले आहेत.
किश्तवाडच्या सिंहपोरा, चटरू भागात ३-४ दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे. यानंतर पोलीस, सैन्याने मिळून हे सर्च ऑपरेशन सुरु केले होते. रात्रीच्या अंधारात दहशतवादी लपलेल्या भागाला वेढा घालण्यात आला. यानंतर त्यांना शरण येण्यास सांगितले गेले, परंतू दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. आताही ही चकमक सुरु आहे.
जम्मू काश्मीर पोलिसांनी चार पाकिस्तानी हँडलरच्या काश्मीरमधील मालमत्ता जप्त केल्या आहेत. सोपोर भागात तीन आणि अवंतीपोरा येथे एक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सध्या हे दहशतवादी हँडलर पाकिस्तानात आहेत.
दरम्यान, एलओसीवर बीएसएफ सतर्क असल्याने दहशतवाद्यांना घुसखोरी करता येत नाहीय. यामुळे पाकिस्तानने ३७ दहशतवादी नेपाळ सीमेवर पाठविले आहेत. तेथून ते भारतात घुसखोरी करण्याची शक्यता आहे. यामुळे नेपाळ सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणची वाहतूकही बंद करण्यात आली आहे.
ते चार दहशतवादी अद्याप बेपत्ता...पहलगामध्ये पर्यटकांवर हल्ला करणारे चार दहशतवाद्यांचा एक महिना झाला तरी अद्याप शोध लागलेला नाही. हे दहशतवादी जंगलात लपले किंवा पाकिस्तानात पळून गेल्याचे देखील अंदाज बांधले जात आहेत. हल्ल्यानंतर काही तासांतच सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांची शोधमोहिम सुरु केली होती. परंतू, हे दहशतवादी जंगलाचा आसरा घेत पळून गेले आहेत. या दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.