देशाची गोपनीय माहिती दिली पाकिस्तानी एजंटला; शस्त्रनिर्मिती कारखान्यातील कर्मचाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 06:59 IST2025-03-15T06:58:43+5:302025-03-15T06:59:33+5:30

मोबाइलमध्ये आढळली गुप्त कागदपत्रे

Secret information of the country was given to a Pakistani agent | देशाची गोपनीय माहिती दिली पाकिस्तानी एजंटला; शस्त्रनिर्मिती कारखान्यातील कर्मचाऱ्याला अटक

देशाची गोपनीय माहिती दिली पाकिस्तानी एजंटला; शस्त्रनिर्मिती कारखान्यातील कर्मचाऱ्याला अटक

लखनऊ : देशाविषयी गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी एजंट असलेल्या फेसबुक फ्रेंडला (नेहा शर्मा) पुरवल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) हजरतपूरच्या शस्त्रनिर्मिती कारखान्यातील कर्मचाऱ्याला अटक केली आहे. एटीएसने  अधिकृतरीत्या ही माहिती प्रसिद्धीमाध्यमांना शुक्रवारी दिली.

या प्रकरणातील आरोपीचे नाव रवींद्र कुमार असे आहे. आरोपी शस्त्रनिर्मिती कारखान्यातील एका विभागाचा प्रमुख आहे. त्याच्याकडून पाच गोपनीय कागदपत्रे, ६,२२० रुपये, एक मोबाइल फोन, एक एटीएम कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि पॅन कार्ड जप्त करण्यात आले आहेत, असे एटीएसच्या निवेदनात म्हटले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून आरोपी रवींद्र कुमार अतिशय संवेदनशील आणि गोपनीय माहिती पाकिस्तानी एजंट असलेल्या आपल्या फेसबुक फ्रेंडला पुरवत होता. ही एजंट पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेसाठी काम करीत असल्याची आणि पैशांचे प्रलोभन दाखवून भारताविषयीची संवेदनशील कागदपत्रे आणि गोपनीय माहिती काढण्याचा प्रयत्न करीत असल्याची ‘खबर’ एटीएसला काही दिवसांपासून मिळत होती. संपूर्ण पाळत ठेवल्यानंतर   रवींद्र कुमार याला अटक करण्यात आली. 

मोबाइलमध्ये आढळली गुप्त कागदपत्रे

एटीएसच्या आग्रा युनिटने आरोपी रवींद्र कुमारला ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशी केली. तेथून त्याला गुरुवारी एटीएसच्या लखनौ मुख्यालयात आणण्यात आले. त्याच्या मोबाइलमध्ये देशाच्या सुरक्षिततेविषयीची संवेदनशील आणि गुप्त कागदपत्रे आढळली. ती त्याने पाकिस्तानी एजंटला पाठवल्याचेही स्पष्ट झाले. मात्र या प्रकाराबद्दल त्याला कोणतेही स्पष्टीकरण देता आले नाही, अशी माहिती एटीएसने दिली.

गुन्ह्याची कबुली? 

सखोल चौकशीत आरोपी रवींद्र कुमारने गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा एटीएसने केला. त्याने दिलेल्या गुन्ह्याच्या कबुलीमुळे त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १४८ आणि कार्यालयीन गुप्तता कायदा १९२३नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला रीतसर अटक करण्यात आली. 

‘ती’ नेहा शर्मा कोण? 

आरोपी रवींद्र कुमार २००६ पासून ऑर्डिनन्स फॅक्टरीत काम करतो. सन २००९ पासून तो विभागप्रमुख पदावर आहे. जुलै २०२४मध्ये त्याची फेसबुकवर नेहा शर्मा हिच्याशी मैत्री झाली. तो तिच्याशी वारंवार व्हॉटस्ॲपवर ऑडीओ आणि व्हिडीओ कॉलद्वारे संभाषण करीत होता, असे एटीएसने सांगितले. 

श्रीमंत होण्यासाठी..

श्रीमंत होण्याच्या मोहापायी आरोपी रवींद्र कुमार नेहा शर्माला गोपनीय माहिती पाठवत असे. त्यानंतर तो दोघांमधील व्हॉटस्ॲप ऑडीओ आणि व्हिडीओ संभाषण वारंवार नष्ट करीत असे; परंतु काही चॅट्स आणि गोपनीय कागदपत्रे डिलिट करण्यास तो विसरल्याने ती त्याच्या मोबाइलमध्ये राहिली, असे एटीएसने म्हटले आहे.

चौकशीतून काय निष्पन्न?

देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होण्याच्या शक्यतेने एटीएस पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. अखेर एटीएसने या प्रकरणाचा छडा लावला. हजरतपूर शस्त्रनिर्मिती कारखान्यातील कर्मचारी असलेला रवींद्र कुमार हा अतिशय संवेदनशील आणि गुप्त माहिती पाकिस्तानी एजंटला पाठवत असल्याचे एटीएसने केलेल्या चौकशीतून निष्पन्न झाले. 
 

Web Title: Secret information of the country was given to a Pakistani agent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.