एसआयआरच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; १२ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांत प्रक्रिया प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:51 IST2025-11-05T12:51:15+5:302025-11-05T12:51:51+5:30
निवडणूक आयोगाने राबविलेली एसआयआर मोहीम ही मोठी फसवणूक असल्याचा विरोधकांचा आरोप

एसआयआरच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; १२ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांत प्रक्रिया प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मतदारयाद्यांच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेला (एसआयआर) नऊ राज्ये व तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरुवात झाली. त्यात अंदमान-निकोबार बेटे, लक्षद्वीप, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, पुडुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाने राबविलेली एसआयआर मोहीम ही मोठी फसवणूक आहे, अशी टीका तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केली. तामिळनाडूमधील सत्ताधारी द्रमुक व मित्रपक्षांनीही ‘एसआयआर’ला विरोध दर्शविला आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, बूथस्तरीय अधिकारी मतदारांचे अर्धवट भरलेले गणना फॉर्म वितरित करतील. एसआयआरची प्रक्रिया ४ डिसेंबरपर्यंत चालेल. ९ डिसेंबरला मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जातील. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम यादी प्रकाशित होईल.
पश्चिम बंगाल, तामिळनाडूत राजकीय वातावरण तापले
पश्चिम बंगालमध्ये मंगळवारपासून एसआयआर सुरू होताच तेथील राजकीय वातावरण तापले. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता टिकून राहण्यासाठी एसआयआर आवश्यक आहे, असे भाजपचे मत आहे; तर या मोहिमेच्या उद्देशाबद्दल तृणमूल काँग्रेसने शंका उपस्थित केल्या आहेत.
आयोगावर भाजपचा दबाव असून मतदार यादीत फेरफार करण्यासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे, असा आरोप तृणमूलने केला. द्रमुकने सर्वोच्च न्यायालयात एसआयआरच्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिले आहे.