"खूप कमी जेवण, १५ दिवस दात घासले नाही..."; अमेरिकेतून बाहेर काढलेल्या भारतीयांसोबत धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 20:32 IST2025-02-16T20:27:28+5:302025-02-16T20:32:30+5:30

अमेरिकेतून भारतात आलेल्या ११६ भारतीयांना पुन्हा एकदा यातना सहन कराव्या लागल्याची माहिती समोर आली आहे.

Second batch of Indians repatriated from US recounts plane disaster | "खूप कमी जेवण, १५ दिवस दात घासले नाही..."; अमेरिकेतून बाहेर काढलेल्या भारतीयांसोबत धक्कादायक प्रकार

"खूप कमी जेवण, १५ दिवस दात घासले नाही..."; अमेरिकेतून बाहेर काढलेल्या भारतीयांसोबत धक्कादायक प्रकार

US Deports 116 Indian: अमेरिकेतून ११६ भारतीयांना घेऊन आलेले विमान शनिवारी रात्री उशिरा अमृतसरला पोहोचले. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्यांदा ११६ भारतीयांना हद्दपार करण्यात आलं. याआधी अमेरिकेचे लष्करी विमान भारतातील विविध राज्यांतील १०४ बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन अमृतसरला पोहोचले होते. त्यावेळी आलेल्या भारतीयांच्या हाता पायात बेड्या घालण्यात आल्या होत्या. यावरुन जोरदार टीका देखील झाली होती. मात्र पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्याची माहिती काही प्रवाशांनी दिली आहे.

अमेरिकेने भारतीय बेकायदेशीर स्थलांतरितांच्या आणखी एका तुकडीला हद्दपार केले आहे. संपूर्ण प्रवासादरम्यान त्यांच्या हातांना हातकड्या लावण्यात आल्याचे हद्दपार केलेल्या लोकांनी सांगितले. त्यांचे पायदेखील साखळदंडांनी बांधलेले होते. काही प्रवाशांनी यावर तीव्र आक्षेप व्यक्त घेतला तर काहींनी आपल्या सुरक्षेसाठी हे असल्याचे सांगितले. गेल्या वेळी जेव्हा अमेरिकेने १०४ भारतीयांना हद्दपार केले होते, तेव्हाही अशाच प्रकारची अमानुष वागणूक देण्यात आल्याचे म्हटलं होतं. यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका झाली. तसेच हे प्रकरण संसदेपर्यंत पोहोचल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना राज्यसभेत उत्तर द्यावे लागले.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे सी-१७ हे लष्करी विमान ९० मिनिटे उशीराने अमृतसरला पोहोचले. ५ फेब्रुवारीला हद्दपार झालेल्या लोकांप्रमाणे आम्हालाही हातकड्या आणि बेड्या घातल्या गेल्या. ६६ तासांचा हा प्रवास नरकासारखा होता. पण हे आमच्या सुरक्षिततेसाठी होते. कारण इतरांच्या मानसिक स्थितीचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही आणि त्यामुळे काहीही होऊ शकते. अमेरिका आपले नियम पाळत होती, असं एका भारतीयाने सांगितले.

दुसरीकडे, विमानतळावर तैनात असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हद्दपार झालेल्यांमध्ये ५ महिलांचा समावेश होता. गेल्या वेळेप्रमाणे या वेळीही मुलांना बेड्या घातल्या नव्हत्या. या लोकांना खूप कमी जेवण देण्यात आले होते. त्यांनी १५ दिवस अंघोळ केली नव्हती आणि दात घासले नव्हते.

दरम्यान, अमृतसरला पोहोचल्यानंतर या लोकांचे इमिग्रेशन आणि पार्श्वभूमी तपासण्यात आली. यानंतर १६ फेब्रुवारीला सकाळी त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. हरियाणा आणि पंजाब सरकारने आपापल्या राज्यातील लोकांना घरी पाठवण्यासाठी विमानतळावर विशेष व्यवस्था केली होती.

Web Title: Second batch of Indians repatriated from US recounts plane disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.