कारवरील नियंत्रण सुटून स्कोर्पिओ तलावात कोसळली; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 10:25 IST2025-04-09T10:25:03+5:302025-04-09T10:25:40+5:30
पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले. एकाच कुटुंबातील ४ जणांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कारवरील नियंत्रण सुटून स्कोर्पिओ तलावात कोसळली; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
बिहारच्या गया जिल्ह्यातील वजीरगंज परिसरात रात्री भीषण अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या २ मुलांचा समावेश आहे. श्राद्धाच्या कार्यक्रमावरून घरी परतताना ही घटना घडली. सोमवारी मध्यरात्री २ च्या सुमारास हे सर्व स्कोर्पिओ कारमधून जात असताना दखिनगावातील तलावात त्यांची कार कोसळली. यावेळी कारमधील ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर वाहन चालकाने कसा बसा त्याचा जीव वाचवला.
मृतकांमध्ये ४० वर्षीय शशिकांत शर्मा, ३८ वर्षीय पत्नी रिंकी देवी, १७ वर्षीय मुलगा सुमित कुमार आणि ९ वर्षीय मुलगा बाळकृष्ण यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी तलावातील चौघांचे मृतदेह बाहेर काढले. तोपर्यंत अपघातग्रस्त कुटुंबाच्या नातेवाईकांनाही ही बातमी कळवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले. एकाच कुटुंबातील ४ जणांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
वाचवा-वाचवा ओरडत होता ड्रायव्हर
अपघातातील कार चालवणारा युवक सिंटू कुमार या दुर्घटनेतून थोडक्यात वाचला आणि बाहेर येऊन वाचवा-वाचवा जोरदार ओरडत होता. ड्रायव्हरचा आवाज ऐकून जवळील हॉटेलमधील लोक तिथे पोहचले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी गावकरी आणि जेसीबीच्या मदतीने स्कोर्पिओ तलावाच्या बाहेर काढली परंतु तोपर्यंत कारमध्ये बसलेल्या चौघांचा जीव गुदमरुन मृत्यू झाला.
या घटनेतील मृत शशिकांत शर्मा हे परिसरातील प्रमुख शेतकरी नेते होते. त्यांचा मोठा मुलगा सुमित राजकारणात सक्रीय होता. गावातील एकाच कुटुंबातील ४ जणांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या चौघांचे मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवले असता गावकऱ्यांना रुग्णवाहिका थांबवत त्याला विरोध केला. कुटुंबातील कोणीच वाचलं नाही मग पोस्टमोर्टम कशाला असा सवाल गावकऱ्यांनी केला. ही घटना कळताच शशिकांतची वृद्ध आईची तब्येत ढासळली. त्यांच्यावरही स्थानिक डॉक्टरांनी उपचार केले.