'सिंधिया इज लेडी किलर', कल्याण बॅनर्जींच्या टीकेनंतर सभागृहात गदारोळ, निलंबनाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 18:53 IST2024-12-11T18:51:49+5:302024-12-11T18:53:01+5:30
तृणमूल खासदार कल्याण बॅनर्जी यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर वैयक्तिक टीका केली.

'सिंधिया इज लेडी किलर', कल्याण बॅनर्जींच्या टीकेनंतर सभागृहात गदारोळ, निलंबनाची मागणी
Kalyan Banerjee On Jyotiraditya Scindia:संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारचा दिवसही गोंधळात गेला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. सिंधियावर टीका करताना बॅनर्जींनी त्यांना 'लेडी किलर' आणि 'विलेन' अशी उपमा दिली. तसेच, 'तुम्ही महाराजा आहात, म्हणून इतरांना कमी दर्जाचे समजता का?' असा खोचक सवालही केला. यावर सिंधिया चांगलेच तापले.
ज्योतिरादित्य सिंधिया चिडले
कल्याण बॅनर्जींच्या टीकेनंतर ज्योतिरादित्य संधिया चांगेलच संतापले. 'तुम्ही वैयक्तिक टीका करत आहात. माझं नाव ज्योतिरादित्य सिंधिया आहे. माझ्या कुटुंबाबद्दल वाईट बोललात, वैयक्तित टीका केली, तर मी सहन करणार नाही. सभागृहातील सर्वजण राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी आले आहेत. तुम्ही सरकारच्या धोरणांवर टीका करा, पण वैयक्तिक टीका खपवून घेणार नाही,' असा पलटवार सिंधियांनी यावेळी केला.
तात्काळ मागितली माफी, पण..
वाढता गदारोळ पाहून कल्याण बॅनर्जी यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली, मात्र सिंधिया यांनी त्यांची माफी स्वीकारणार नसल्याचे सांगितले. कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'माझा हेतू सिंधिया किंवा कुणालाही दुखावण्याचा नव्हता. मी माफी मागतो.' कल्याण बॅनर्जी यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात एकच गोंधळ सुरू झाला, ज्यामुळे सभागृहाचे कामकाज सायंकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
महिला खासदारांनी केली तक्रार
कल्याण बॅनर्जींच्या या वक्तव्यावरुन राजकारण तापले आहे. त्यांच्याविरोधात भाजपच्या महिला खासदारांनी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे तक्रार केली आहे. कल्याण बॅनर्जी यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याचा आरोप महिला खासदारांनी केला आहे. कल्याण बॅनर्जी यांना अधिवेशनाच्या उर्वरित भागासाठी निलंबित करण्याची मागणी महिला भाजप खासदारांनी केली आहे.