दोन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरला जाणारे इंडिगो एअरलाईनचे विमान निसर्गाच्या कचाट्यात सापडले होते. या विमानातून एका खासदारांसह २२७ प्रवासी प्रवास करत होते. आपत्कालीन परिस्थितीत वैमानिकांनी पाकिस्तानकडे मदत मागितली होती, परंतू परवानगी मिळाली नाही. तरीही तशाच परिस्थितीत पायलटनी धैर्य राखून विमान सुखरूप विमानतळावर उतरविले होते. आता या दोन पायलटना या प्रकरणाची चौकशी सुरु असेपर्यंत विमानोड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
२१ मे च्या सायंकाळी दिल्लीहून श्रीनगरला हे विमान निघाले होते. या विमानाच्या पायलटना विमाने चालविण्यास रोखण्यात आले आहे. डीजीसीएने हे आदेश जारी केले आहेत.
या घटनेवेळी दोन्ही वैमानिकांनी खूप संयम दाखवला. काहीही अनुचित घडले नाही आणि सर्वजण सुरक्षित आहेत याबद्दल आम्ही दोन्ही वैमानिकांचे आभारी आहोत. सध्या आम्ही प्रत्यक्षात काय घडले याचा तपास करत आहोत, असे नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी म्हटले.
एअरबस A321 निओ अचानक 8,500 फूट प्रति मिनिट वेगाने खाली जात होते. वादळात अडकल्यामुळे विमानाची उड्डाण प्रणाली निकामी झाली होती. यामुळे सामान्यपणे खाली येण्याच्या वेगापेक्षा हा वेग चौपटीने जास्त होता. यामुळे वैमानिकांना एकाच वेळी विमान सामान्य वेगात आणण्यासाठी थांबवण्याच्या आणि वेगापेक्षा जास्त वेगाच्या सूचना मिळत होत्या. डीजीसीए या प्रकरणाची चौकशी करत आहे. डीजीसीएच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चौकशी होईपर्यंत दोन्ही वैमानिकांना उड्डाण करण्यास मनाई करण्यात आली आहे.