Sanjay Singh House Arrest: आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा आपने केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले की, भाजपने आता उघडपणे गुंडगिरीचा मार्ग अवलंबला आहे. केजरीवालांनी संजय सिंह यांचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ते कुलूप लावलेल्या गेटवर चढून राज्याचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना बोलताना दिसत आहेत.
जनतेचा आवाज दाबला जातोय - केजरीवाल
अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी (११ सप्टेंबर) एका एक्स पोस्टमध्ये म्हटले की, 'संजय सिंह यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला त्यांना भेटण्यासाठी गेस्ट हाऊसवर गेले, पण पोलिसांनी त्यांना भेटूही दिले नाही. लोकांचा आवाज दाबला जातोय, विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे. भाजपने उघड गुंडगिरीचा मार्ग अवलंबला आहे,' अशी टीका केजरीवालांनी केली.
अशी कृत्ये वारंवार घडत आहेत - मुख्यमंत्री
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला या घटनेबाबत म्हणाले की, 'संजय सिंह यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. जबाबदार लोकच याचे कारण सांगू शकतात. अशी कृत्ये वारंवार घडत आहेत. एकीकडे असे म्हटले जाते की, जम्मू-श्मीरमध्ये सर्व काही ठीक आहे, वातावरण शांत आहे आणि लोक आनंदी आहेत. पण वास्तव पूर्णपणे वेगळे आहे.'
'आमच्यावर कठोर कारवाई केली जात आहे आणि कोणत्याही वैध कारणाशिवाय कायदा आणि सुव्यवस्थेचा गैरवापर केला जातोय. दोडाचे आमदार मेहराज मलिक यांच्यावर लावण्यात आलेला पीएसए हे याचे आणखी एक उदाहरण आहे. त्यांना कोणत्याही वैध कारणाशिवाय अटक करण्यात आली,' असा आरोपही त्यांनी केला.
आप आमदाराविरुद्ध पीएसए
जम्मू-काश्मीरमधील आपचे एकमेव आमदार मेहराज मलिक यांच्या अटकेविरुद्ध एकता दर्शविण्यासाठी संजय सिंह श्रीनगरला पोहोचले होते. मात्र, त्यांना नजरकैदेत ठेवल्याचा दावा आपने केला आहे.