संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 19:34 IST2025-10-31T19:33:20+5:302025-10-31T19:34:53+5:30
मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन, आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेत असलेले नाव म्हणजे संजय राऊत..महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून राऊत चर्चेचा केंद्रबिंदु बनले. त्यातच गेल्या लोकसभा निवडणुकीपासून आजतागायत संजय राऊत यांची पत्रकार परिषद आणि राज्याच्या राजकारणात आरोपांचा धुरळा असं समीकरण बनले. मात्र हेच संजय राऊत आता पुढील काही दिवस सक्रीय राजकारणापासून दूर राहणार आहेत.
राऊतांनी स्वत: याबाबत पत्रक काढत माहिती दिली असून त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राऊतांच्या पोस्टची दखल घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊतांचे पोस्ट रिट्विट करून त्यांना लवकर बरे व्हा असं म्हटलं आहे. मोदी म्हणाले की, संजय राऊतजी, तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो असं त्यांनी म्हटलं. त्यावर राऊतांनीही पंतप्रधानांचे आभार मानले.
Praying for your speedy recovery and good health, Sanjay Raut Ji.@rautsanjay61https://t.co/nGgRFO4AhS
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2025
काय म्हणाले संजय राऊत?
आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले. पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे आणि गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन, आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ठाकरे गटासाठी चिंताजनक
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासह मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल लवकरच वाजणार आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून अनेक आव्हानांचा सामना करत असलेल्या शिवसेना ठाकरे गटासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह सर्व नेत्यांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात ठाकरे गटाची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असणारे संजय राऊत २ महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.