UP Elections, Sanjay Raut: "गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणारेत का?", संजय राऊतांची भाजपवर जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 11:20 IST2022-01-17T11:20:07+5:302022-01-17T11:20:43+5:30
जिवंत माणसं त्यांना अजिबात मत देणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे, असंही राऊत म्हणाले.

UP Elections, Sanjay Raut: "गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणारेत का?", संजय राऊतांची भाजपवर जहरी टीका
नवी दिल्ली: योगी आदित्यनाथ यांचे सरकार हे अंहकारयुक्त सरकार आहे. अहंकार सगळ्यांना एक दिवस संपवून टाकतो. त्यामुळे योगी आणि भाजपला आगामी निवडणुकीत कोणीही मतदार मत देणार नाही. भाजपचे लोक जर म्हणत असतील की आम्ही बहुमताने निवडून येऊ तर त्यांना माझा असा प्रश्न आहे की तुम्हाला मतदान करायला गंगेत वाहून गेलेले मृतदेह येणार आहेत का? कारण जिवंत लोक योगींना आणि भाजपला मत देणं शक्यच नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर हल्लाबोल केला.
अखिलेश यादव यांनी आपलं संपूर्ण लक्ष निवडणुकांवर केंद्रित करायला हवं. भाजरच्या विचारधारेच्या विरोधी विचारधारा असणाऱ्या पक्षांची एकत्रित मोट बांधून निवडणुक लढवायला हवी. उत्तर प्रदेशची जनता अखिलेश यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे. आम्हीदेखील निवडणुकीत लढत आहोत. पण परिवर्तन आणायचं असेल तर बिगरभाजपा पक्षांनी एकत्रित येऊनच निवडणूक लढवायला हवी, असं सूचक वक्तव्य संजय राऊतांनी केलं.
पंतप्रधान मोदींनी कुंभस्नान केलं आणि नंतर दलितांचे पाय धुतले. आता भाजपचे लोक देखील दलितांच्या घरी जाऊ जेवत आहेत आणि त्यांची सेवा करत आहेत. अशा लोकांच्या डोक्यातून जातीपातीचं राजकारण कधी जाणार, असा मला प्रश्न पडतो. हे सारं भाजपाचं ढोंग आहे. केवळ मतदानासाठी हे राजकारण केलं जातंय, असा आरोप राऊत यांनी भाजपावर केला.