भावजयीच्या खूनप्रकरणी दिरास जन्मठेप संगमनेर : जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:09+5:302015-02-14T23:52:09+5:30
संगमनेर : धारधार कोयत्याने सख्ख्या भावजयीचा खून करणार्या दिरास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

भावजयीच्या खूनप्रकरणी दिरास जन्मठेप संगमनेर : जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
स गमनेर : धारधार कोयत्याने सख्ख्या भावजयीचा खून करणार्या दिरास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याबाबत वृत्त असे, १६ डिसेंबर २००३ रोजी रतनवाडी (ता. अकोले) येथील तान्हाबाई बाळू भालेराव (वय २२) ही सकाळी घरात चुलीवर स्वयंपाक करीत होती. याचवेळी तान्हाबाई यांचा दीर आरोपी प्रकाश अंकुश भालेराव (वय ५०) हा तेथे आला. त्याने हातातील धारधार कोयत्याने तान्हाबाईच्या मानेवर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेली तान्हाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आरोपीची आई चंद्रभागा अंकुश भालेराव ही धावत आली. तिने त्वरित पुतण्यास घटनेची माहिती दिली. याप्रकरणी चंद्रभागा भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजूर पोलिसांनी आरोपी प्रकाश भालेराव याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. मात्र घटनेनंतर आरोपी फरार झाल्याने त्याला शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. अखेर घटनेच्या चार दिवसानंतर आरोपी स्वत:हून राजूर पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केल्यापासून तो कारागृहात होता. सदर खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होती. खटल्यात एकूण ८ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यात आरोपीची आई व फिर्यादी चंद्रभागा भालेराव यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सुनावणी दरम्यान आरोपीने भाऊ बाळू भालेराव याच्या पहिल्या बायकोला देखील १९९६ मध्ये मारले होते. या गुन्ह्यात त्याला पाच महिन्यांची शिक्षा झाल्याचे समोर आले. तसेच आरोपी प्रकाशला दोन बायका असून त्या नांदत नव्हत्या. घरची मंडळी दुर्लक्ष करतात, बायकांना नांदायला आणत नाहीत, या गोष्टीचा राग त्याच्या मनात होता. त्या रागातूनच त्याने भावजयीचा खून केल्याची कबुली दिली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. भगत यांनी आरोपी प्रकाश भालेराव यास जन्मठेप व १ हजार रूपये दंड, तसेच दंड न भरल्यास २ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. बी.जी. कोल्हे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)