Sambhal Police Officer on Holi: आठवड्याभरावर होळीचा सण आल्याने सर्वत्र जोरदार तयारी सुरु झालीय. देशभरात मोठ्या उत्साहात होळी सण साजरा होतो. मात्र उत्तर प्रदेशात होळीच्या सणावरुन एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्याने मुस्लिम समाजाला उद्देशून होळी सणाबाबत केलेल्या विधानाने वातावरण तापलं असून देशभरात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. होळीचा सण आवडत नसेल तर घरात बसा असा सल्ला उत्तर प्रदेशातील सर्कल ऑफिसर अनुज चौधरी यांनी दिला आहे.
रमजान ईद आणि होळी सणांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील संभलमध्ये जिल्हा पोलीस आणि प्रशासन सतर्क आहे. रमजानच्या महिन्यात शुक्रवारच्या नमाजसोबत येणाऱ्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी संभळ कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला दोन्ही समाजातील लोक सहभागी झाले होते. यावेळी सर्कल ऑफिसर अनुज चौधरी यांनी समाजकंटकांना कडक इशारा दिला. तुम्ही तुमच्या धर्माचा आदर करत असाल तर तुम्ही इतर धर्माच्या लोकांना किड्यासमान समजू नका, असा इशारा अनुज चौधरी यांनी दिला. तसेच ज्यांना होळीच्या रंगांचा त्रास होत असेल त्यांनी घरातच राहावे कारण होळी वर्षातून एकदाच येते असंही अनुज चौधरी म्हणाले.
"जे शांतता समितीच्या बैठकीसाठी आले नाहीत त्यांना मी सांगतोय की शुक्रवारची नमाज वर्षातून ५२ वेळा येते, पण होळी फक्त एक दिवस आहे. ज्याला होळी खेळायची आहे आणि ज्याच्यामध्ये होळी खेळण्याची क्षमता आहे, त्यानेच घरातून बाहेर पडावे. अन्यथा घरातच राहून नमाज अदा करावी. कारण, पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारचा उपद्रव सहन करण्याच्या मनस्थितीत नाही. ज्या व्यक्तीला रंग आवडत नाही त्यांनी घराबाहेर पडू नये. ज्यांची रंग सहन करण्याची क्षमता आहे त्यांनीच घरातून बाहेर पडावं," असं सीओ अनुज चौधरी म्हणाले.
"कोणत्याही परिस्थितीत शांतता व सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे हे लक्षात ठेवा. सभेत मुस्लिम समाजाला स्पष्टपणे सांगण्यात आलंय की, ज्याप्रमाणे तुम्ही वर्षभर ईदची वाट पहाता, त्याचप्रमाणे होळी हाही हिंदूंचा सण आहे. जर रंगाला आक्षेप असेल तर त्या दिवशी घराबाहेर काढण्याची चूक करू नका. त्या दिवशी नमाज वगैरे फक्त घरातच करा, कारण देव आणि अल्लाह सर्वत्र आहेत. पोलीस कोणत्याही परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन होऊ देणार नाही. हिंदू पक्षानेही विनाकारण कोणावरही रंग टाकू नये. नियम सर्वांसाठी समान आहेत, असंही अनुज चौधरींनी म्हटलं.
"मी हे थेट आणि स्पष्टपणे सांगत आहे की जुम्मा वर्षातून ५२ वेळा येतो, होळी वर्षातून एकदा येते. होळीच्या रंगांमुळे तुमचा धर्म भ्रष्ट होईल असे मुस्लिम समाजातील कुणाला वाटत असेल तर त्यांनी त्या दिवशी घराबाहेर पडू नये. जर घरातून बाहेर पडणार असाल तर मन इतकं मोठं ठेवा की सगळे एकच आहेत असं वाटेल.रंग म्हणजे रंग आहे. मुस्लीम मंडळी जशी वर्षभर ईदची वाट पाहत असतात, त्याचप्रमाणे हिंदूही होळीची वाट पाहत असतात. रंग टाकून, मिठाई खाऊ घालून, बुरा ना मानो होली है म्हणत होळी साजरी केली जाते," असं चौधरी यांनी स्पष्ट केलं.