लखनऊच्या निगोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रचंदपूर विधानसभेचे समाजवादी पक्षाचे आमदार राहुल लोधी यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर आली. हा अपघात सोमवारी सकाळी मस्तीपूर गावाजवळ घडला. सुदैवाने, राहुल लोधी यांना मोठी दुखापत झाली नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अचानक कारचे स्टेअरिंग तुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार राहुल लोधी हे लखनऊहून रायबरेलीच्या दिशेने प्रवास करत असताना मस्तीपूर गावाजवळ त्यांच्या कारचे स्टेअरिंग तुटले आणि कार रस्त्याच्या कडेला उलटली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत राहुल लोधी वाहनातून बाहेर काढले आणि नजीकच्या रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने, त्यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला. या अपघातामुळे काही वेळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली.
या घटनेबाबत राहुल लोधी यांनी एक्सवर पोस्ट केली. सोमवारी सकाळी लखनौहून रायबरेलीला जात असताना, माझ्या स्कॉर्पिओचा स्टीअरिंग रॉड तुटला आणि गाडी उलटून अपघात झाला. देवाच्या कृपेने, वडिलांचा आशीर्वाद आणि शुभचिंतकांच्या प्रार्थनेने मी आणि माझी संपूर्ण टीम पूर्णपणे सुरक्षित आहोत. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, असे लोधी म्हणाले.