'शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय, खतांच्या दरवाढीचा निर्णय मागे घ्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 03:01 PM2021-05-18T15:01:11+5:302021-05-18T15:25:15+5:30

पेट्रोलच्या किमती शंभर पार असताना केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवून सामान्यांना वेठीस धरल्याची टीका विरोधकाकडून होत आहे. एकीकडे कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात असताना खतांच्या किंमतीत वाढ करुन शेतकऱ्यांना आणखी संकटात टाकण्याचं काम केंद्र सरकारने केलंय

'Salt rubbed on farmers' wounds, reverse decision on fertilizer price hike', sharad pawar letter to minister on fartilizer and chemical | 'शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय, खतांच्या दरवाढीचा निर्णय मागे घ्या'

'शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय, खतांच्या दरवाढीचा निर्णय मागे घ्या'

Next

मुंबई - कोरोना संकट काळात रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी एका पत्राद्वारे केली होती. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी कृषीमंत्रीशरद पवार यांनी संबंधित खात्याचे केंद्रीयमंत्री सदानंद गौडा यांना खत दरवाढीच्या विरोधात पत्र लिहिले आहे.  

पेट्रोलच्या किमती शंभर पार असताना केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवून सामान्यांना वेठीस धरल्याची टीका विरोधकाकडून होत आहे. एकीकडे कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात असताना खतांच्या किंमतीत वाढ करुन शेतकऱ्यांना आणखी संकटात टाकण्याचं काम केंद्र सरकारने केलंय. त्यामुळे, विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलंय. आता, खुद्द शरद पवार यांनीही या दरवाढीची दखल घेत केमीकल आणि फर्टीलायजर मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. तसेच, या दरवाढीकडे आपण गांभीर्याने पाहून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंतीही केली आहे. 



लॉकडाऊनमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केंद्र सरकारने केलंय. केंद्राचा हा निर्णय अतिशय धक्कादायक असून तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा, असेही त्यांनी सूचवले आहे. 

रोहित पवारांनी लगावला टोला

"खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून 'किसान सन्मान निधी'चे पैसे तुघलकी पद्धतीने व्याजासह वसूल करायचे सरकारने ठरवले की काय, अशी शंका येते. करोनाच्या काळात उद्योगांचे कंबरडे मोडून बेकारी वाढत असताना शेती हेच एकमेव क्षेत्र आहे. जे लोकांच्या जगण्याचा आधार बनलंय. अशा परिस्थितीत खतांच्या किंमती वाढवून हा आधारही सरकारने काढून घेऊ नये आणि या वाढीव किंमती तातडीने कमी कराव्यात, ही विनंती!", असे रोहित पवार म्हणाले.

कृषीमंत्री भुसे यांनीही केली मागणी

दरम्यान, याआधी कृषीमंत्री दादा भुसे यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत केलेली दरवाढ कमी करण्याची मागणी केली होती. कोरोनामुळे शेतीचे कामे सुरू असली तरी बाजारपेठा बंद असल्याने शेतकरी अडचणीत आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत झालेली वाढ अव्वाच्या सव्वा आहे आणि ती शेतकऱ्याला परवडणारी नाही. बऱ्याच खतांच्या किंमतीत ७०० ते ८०० रुपयांची वाढ झाली आहे. सध्याची करोनाची स्थिती पाहता ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी विनंती कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली होती.

'केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करत आहे'

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे. "पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढल्याचा धक्का सर्व भारतीयांना लागलाच आहे. मात्र आता खतांच्या किमती प्रचंड वाढविण्याचे पाप केंद्र सरकारने केले आहे. कोरोनाने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या माथी हा दरवाढीचा बोजा टाकत केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करत आहे", असे जयंत पाटील म्हणाले. याचबरोबर, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या खतांच्या दरवाढीचा निषेध करते. आमचा शेतकरी बांधव याविरोधात आंदोलन करणार आहे. त्या आंदोलनास देशभरातून प्रतिसाद मिळेल, हा मला विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहील", असेही जयंत पाटील म्हणाले आहेत.
 

Read in English

Web Title: 'Salt rubbed on farmers' wounds, reverse decision on fertilizer price hike', sharad pawar letter to minister on fartilizer and chemical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.