शीखविरोधी दंगल: सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा, म्हणाला- 'मी 80 वर्षांचा झालोय, त्यामुळे...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:43 IST2025-02-25T15:42:39+5:302025-02-25T15:43:37+5:30

पीडित महिला 1984 पासून न्यायाची वाट पाहत होती. आज अखेर राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने माजी काँग्रेस खासदाराला शिक्षा सुनावली.

Sajjan Kumar Verdict: Anti-Sikh riots: Former Congress MP Sajjan Kumar sentenced to life imprisonment | शीखविरोधी दंगल: सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा, म्हणाला- 'मी 80 वर्षांचा झालोय, त्यामुळे...'

शीखविरोधी दंगल: सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा, म्हणाला- 'मी 80 वर्षांचा झालोय, त्यामुळे...'


Sajjan Kumar News :दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने 1984 च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी दोषी ठरलेले काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने 21 फेब्रुवारी रोजी शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला होता. दंगलीदरम्यान सरस्वती विहारमधील जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांच्या हत्येशी संबंधित हे प्रकरण आहे. त्यावेळी सज्जन कुमार दिल्ली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा खासदार होता. 

फाशीची शिक्षा देण्याची मागणी
1984 च्या शीख विरोधी दंगलीत सज्जन कुमारने केलेल्या जमावाच्या हल्ल्यात जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांची 1 नोव्हेंबर 1984 रोजी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मृत जसवंत यांच्या पत्नीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सज्जन कुमार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अनेक वर्षांनंतर आता आज याप्रकरणी आरोपीला शिक्षा झाली आहे. विशेष म्हणजे, दिल्ली दंगलीशी संबंधित आणखी एका प्रकरणात सज्जन कुमार जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

मी 80 वर्षांचा झालोय, त्यामुळे...
दिल्ली पोलिस आणि पीडितांनी हे प्रकरण दुर्मिळ प्रकरण मानून सज्जन कुमारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालापूर्वी सज्जन कुमारने शिक्षेत सौम्यतेचे आवाहन केले होते. या प्रकरणात मला फाशीची शिक्षा देण्यास कोणताही आधार नसल्याचे त्याने आपल्या युक्तिवादात म्हटले. सज्जन कुमार म्हणाला की, मी 80 वर्षांचा झालो आहे. वाढत्या वयाबरोबर मी अनेक आजारांशी झुंजत आहे. मी 2018 पासून तुरुंगात आहे. तेव्हापासून मला कोणतीही फर्लो/पॅरोल मिळालेली नाही. तुरुंगात माझी वागणूक नेहमीच चांगली होती, माझ्याविरुद्ध कोणतीही तक्रार आली नाही. त्यामुळे माझ्यात सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी तीनदा खासदार झालो,  अनेक सामाजिक कामे केली, त्यामुळे मी स्वतःला निर्दोष समजतो. न्यायालयाने मानवतावादी पैलू लक्षात घेऊन या प्रकरणात किमान शिक्षेचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आरोपीने केली होती.

28 प्रकरणांमध्ये दोषी 
हिंसाचार आणि त्यानंतरच्या घटनांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नानावटी आयोगाने सांगितले की, दिल्लीत दंगलीच्या संदर्भात 578 एफआयआर नोंदवण्यात आले होते, ज्यामध्ये 2733 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी 240 प्रकरणे “अज्ञात” म्हणून बंद करण्यात आली, तर 250 प्रकरणांमध्ये लोकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. केवळ 28 प्रकरणांमध्ये दोष सिद्ध झाले, ज्यात अंदाजे 400 लोकांना दोषी ठरवण्यात आले. त्यावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि खासदार सज्जन कुमार यांच्यावर 1 आणि 2 नोव्हेंबर 1984 रोजी दिल्लीतील पालम कॉलनीमध्ये पाच जणांच्या हत्येचा आरोपही होता. 
 

Web Title: Sajjan Kumar Verdict: Anti-Sikh riots: Former Congress MP Sajjan Kumar sentenced to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.