२६ जानेवारीला मराठी अस्मिता दिल्लीत झळकणार; राजपथावर ‘महाराष्ट्राची संत परंपरा’ दिसणार

By प्रविण मरगळे | Published: January 20, 2021 10:15 AM2021-01-20T10:15:22+5:302021-01-20T10:19:06+5:30

कँटॉन्मेंट परिसरातील रंगशाळेत महाराष्ट्राच्या चित्ररथाचे वैविध्यपूर्ण काम पूर्णत्वास येत असून या चित्ररथावरील प्रतिकृती खास आकर्षण ठरत आहेत.

Saint tradition of Maharashtra Chitrarath will be seen on Rajpath on January 26 Republic Day Parade | २६ जानेवारीला मराठी अस्मिता दिल्लीत झळकणार; राजपथावर ‘महाराष्ट्राची संत परंपरा’ दिसणार

२६ जानेवारीला मराठी अस्मिता दिल्लीत झळकणार; राजपथावर ‘महाराष्ट्राची संत परंपरा’ दिसणार

Next
ठळक मुद्देप्रजासत्ताकदिनी राजपथावर राज्याच्या अस्मितेचे दर्शन पुन्हा एकदा घडणार आहे.चित्ररथ बांधणीचे कार्य नागपूर येथील टीम शुभचे प्रमुख राहुल धनसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ८ फुटांची आसनस्थ मूर्ती आहे

नवी दिल्ली – २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी ऐतिहासिक राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी ‘महाराष्ट्राच्या  संत परंपरे’वर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या पथसंचलनाची पूर्वतयारी म्हणून होणाऱ्या रंगीत तालमीसाठी चित्ररथ बांधणीच्या कामाने चांगलीच गती घेतली आहे. महाराष्ट्रासह अन्य निवड झालेल्या राज्य आणि केंद्रीय मंत्रालयांचे चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी होणार आहेत.

कँटॉन्मेंट परिसरातील रंगशाळेत महाराष्ट्राच्या चित्ररथाचे वैविध्यपूर्ण काम पूर्णत्वास येत असून या चित्ररथावरील प्रतिकृती खास आकर्षण ठरत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने प्रजासत्ताकदिनी राजपथावर राज्याच्या अस्मितेचे दर्शन पुन्हा एकदा घडणार आहे. यंदा प्रदर्शित होणाऱ्या चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचलनाचे कार्य पार पडते.

हे कलाकार साकारत आहेत चित्ररथ

राज्याच्या चित्ररथ बांधणीचे कार्य नागपूर येथील टीम शुभचे प्रमुख राहुल धनसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.  या चित्ररथाचे संकल्पनाचित्र व त्रिमिती प्रतिकृती रोशन गुले (२४)  आणि तुषार प्रधान (२३) या  तरूण कलाकारांनी तयार केले आहे. कला दिग्दर्शक नरेश चरडे आणि पंकज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ३० कलाकार हा आकर्षक चित्ररथ उभारत आहेत.

असा आहे चित्ररथ

चित्ररथाच्या प्रारंभी वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ८ फुटांची आसनस्थ मूर्ती आहे. त्यांच्या मूर्तीसमोर ‘ज्ञानेश्वरी ग्रंथ’ दर्शविण्यात आला आहे. चित्ररथाच्या  मध्यभागी ‘भक्ती आणि शक्ती’चा संदेश देणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस असणारे संत तुकाराम महाराज यांची भेट दर्शविणारे प्रत्येकी ८ फूट उंचीचे दोन पुतळे उभारण्यात आले आहेत. या पाठोपाठ राज्यातील संतांचे व कोट्यवधी भक्तांचे दैवत असणाऱ्या पांडुरंगाची कडेवर हात असणारी ८.५ फूट उंचीची लोभस मूर्ती उभारण्यात आली आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात ८ फूट उंचीचा ‘संतवाणी’ हा ग्रंथ उभारण्यात आला आहे व यावर संतांची वचने लिहिण्यात आली आहेत. या सर्व पुतळ्यांची बांधणी पूर्ण झाली असून त्यावर रंगकाम सुरु आहे.

चित्ररथाच्या दोन्ही बाजूस संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत शेख महंमद, संत नरहरी, संत सावता, संत दामाजीपंत, संत गोरोबा, संत एकनाथ, संत सेना, संत चोखामेळा यांच्या प्रतिकृती असणार आहेत. या प्रतिकृती बनविण्याचे काम सुरु असून  त्यांच्या बांधणीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे टीम शुभचे राहुल धनसरे यांनी सांगितले.  

Web Title: Saint tradition of Maharashtra Chitrarath will be seen on Rajpath on January 26 Republic Day Parade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.