चोरट्यांचा ३६ हजार कोटींवर डल्ला
By Admin | Updated: January 6, 2015 01:55 IST2015-01-06T01:55:21+5:302015-01-06T01:55:21+5:30
राजधानी दिल्ली गुन्ह्यांची राजधानी बनली आहे. वर्षभरात येथील चोरटे अर्थसंकल्पाच्या बरोबरीच्या रकमेवर डल्ला मारतात.

चोरट्यांचा ३६ हजार कोटींवर डल्ला
दिल्लीतील प्रकार : चोरीची रक्कम अर्थसंकल्पाच्या बरोबरीची
नितीन अग्रवाल - नवी दिल्ली
राजधानी दिल्ली गुन्ह्यांची राजधानी बनली आहे. वर्षभरात येथील चोरटे अर्थसंकल्पाच्या बरोबरीच्या रकमेवर डल्ला मारतात. एकेकाळी स्कॉटलँड यार्ड पोलिसांशी तुलना होणारे दिल्लीचे पोलीस चोऱ्यांचा छडा लावण्यात पुरते मागे आहेत.
२०१४ मध्ये दिल्लीतील चोरट्यांनी किमान ३६ हजार कोटींच्या मालमत्तेवर हात मारला. दिल्लीचे वार्षिक अंदाजपत्रकही ३६,७६६ कोटींचे होते हे उल्लेखनीय. या
शहरात चोरांनी २०१३ मध्ये ३४,५९४ कोटी, २०१२ मध्ये २१,२११, २०११ मध्ये २०,५६६ कोटींच्या मालमत्तेवर हात मारला. पोलीस ठाण्यांमध्ये नोंद झालेल्या घटनांमधील रोख आणि अन्य स्वरूपातील मालमत्तेसंबंधी ही आकडेवारी आहे. छोट्या चोऱ्यांबद्दल लोक पोलीस ठाण्यांकडे तक्रार करण्याची तसदीही घेत नाहीत.
खिसेकापू महिला चोर...
दिल्लीत बालगुन्हेगारी आणि महिलांचा वाढता सहभाग पोलिसांसाठी डोकेदुखीचे कारण ठरला आहे. गेल्यावर्षी दरोड्याच्या ८९, भुरट्या चोऱ्यांमध्ये २६२, तर वाहन चोरीच्या प्रकरणांमध्ये १११ बाल गुन्हेगारांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेट्रोच्या १३४ रेल्वेस्थानकांवर खिसेकापू चोरांमध्ये महिलांचा सहभाग जास्त असतो. जानेवारी ते नोव्हेंबर २०१४ या ११ महिन्यांच्या काळात २९३ खिसेकापू महिला चोरांना पकडण्यात आले. पुरुष खिसेकापूंची संख्या केवळ २२ असल्याचे आढळून आले आहे.
२०१४ मधील चोरीचा ऐवज
दागिने- ५५३५ कोटी रुपये
रोख- ६,५७२.८६ कोटी रुपये
फोन, लॅपटॉप- १,७२९.७० कोटी रुपये
वाहने- १६,०८६.३० कोटी रुपये
अन्य चोऱ्या- ४,८७०.१९ कोटी रुपये
हायटेक चोऱ्या...: दिल्लीतील चोर हायटेक बनले आहेत. चोरीच्या मालावर जास्तीत जास्त नफा कमावतानाही ते तंत्रज्ञानाचा वापर करतात. मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चोऱ्या वाढल्या आहेत. आॅनलाईन फ्री क्लासिफाईड साईटच्या माध्यमातून वस्तू विकताना फसवेगिरीचा फंडा अवलंबला जातो.