मेघालयातील हनिमून हत्या प्रकरणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेलं इंदूरचं रघुवंशी कुटुंब आता एका नवीन वादात सापडलं आहे. राजा रघुवंशीचा मोठा भाऊ सचिन रघुवंशी याची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या एका महिलेने सचिनच तिच्या मुलाचा बाप असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर महिलेने तिच्या दाव्याच्या समर्थनार्थ डीएनए रिपोर्टही दाखवला आहे. महिलेच्या या खळबळजनक खुलाशामुळे आता राजा रघुवंशीच्या घरातील भलताच वाद समोर आला आहे.
न्यूज १८ च्या रिपोर्टनुसार, १ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेदरम्यान माध्यमांशी बोलताना, महिलेने सांगितलं की, डीएनए चाचणीने सचिन रघुवंशी हा तिच्या मुलाचा बाप असल्याची पुष्टी केली आहे. तिने दावा केला की, सचिनने तिच्याशी मंदिरात विधीवत लग्न केलं. तिच्याकडे लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो देखील आहेत. महिलेने पत्रकार परिषदेदरम्यान हे फोटो देखील दाखवले.
"माझ्या मुलाला जाणूनबुजून नाकारण्यात आलं. हा फक्त माझाच नाही तर माझ्या मुलाचाही अपमान आहे. आज माझं मूल दारोदारी भटकत आहे. सचिनला आता उत्तर द्यावे लागेल. जर सचिनने सर्वांसमोर लग्न केलं असतं आणि आमचं नातं स्वीकारलं असतं तर आपल्याला या अपमानातून जावे लागलं नसतं. जेव्हा जेव्हा मी न्याय मागितला तेव्हा कुटुंबाने प्रत्येक वेळी माझ्याकडे पाठ फिरवली आणि माझा अपमान केला."
"माझ्या मुलाला कायदेशीर हक्क मिळण्याच्या आशेने मी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मला विश्वास आहे की उच्च न्यायालयातून न्याय मिळेल" असं महिलेने म्हटलं आहे. राजा रघुवंशीच्या हत्येमुळे रघुवंशी कुटुंब आधीच चर्चेत होतं. आता सचिनवरील आरोपांमुळे पुन्हा चर्चा रंगली आहे. राजाच्या हत्याप्रकरणात सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक करण्यात आली आहे.