Sachin Pilot and Jyotiraditya Scindia can provide strength to congress; says milind deora | 'या' दोघांमध्ये काँग्रेस अध्यक्ष होण्याची 'पॉवर'; मिलिंद देवरांची 'मन की बात'

'या' दोघांमध्ये काँग्रेस अध्यक्ष होण्याची 'पॉवर'; मिलिंद देवरांची 'मन की बात'

ठळक मुद्देकाँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी या पदासाठी दोन नावं सुचवली आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी काही दिवसांपूर्वी प्रियंका गांधी यांचं नाव पुढे आलं होतं.

लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे पक्षाला 'अच्छे दिन' दाखवू शकेल, असा नवा अध्यक्ष शोधण्याची मोहीम काँग्रेसमध्ये गेला महिनाभर सुरू आहे. या पदासाठी अनेक नावं चर्चिली गेली, पण अद्याप कुणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडलेली नाही. या पार्श्वभूमीवर, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी दोन नावं सुचवली आहेत. 

काँग्रेसचा नवा अध्यक्ष हा तरुण असावा, सक्षम असावा. त्याला निवडणुकीचं राजकारण, प्रशासन आणि पक्ष संघटनेच्या कामाचा अनुभव असला पाहिजे. संपूर्ण देशात तो नेता म्हणून स्वीकारला गेला पाहिजे, त्याला समर्थन मिळालं पाहिजे. हे सर्व गुण सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे या दोघांकडे आहेत. ते काँग्रेसच्या संघटनेला नवं बळ देऊ शकतात, असं मत मिलिंद देवरा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेकडे व्यक्त केलं आहे.  

काँग्रेस अध्यक्षपदासाठी काही दिवसांपूर्वी प्रियंका गांधी यांचं नाव पुढे आलं होतं. काँग्रेस नेते शशी थरूर, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या नावाला पाठिंबा जाहीर केला होता. परंतु, खुद्द प्रियंका यांनीच या चर्चांवर पडदा पाडला. 'मला यात विनाकारण ओढू नका', असा स्पष्ट इशाराच त्यांना नेतेमंडळींना दिला होता. काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्यातील व्यक्ती नसेल, असं राहुल गांधी यांनीही स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता, गांधी घराण्याशी अत्यंत जवळचे संबंध असलेले मिलिंद देवरा यांनी सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांची नावं सुचवली आहेत. 

दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक येत्या 10 ऑगस्टला होतेय. त्यात अध्यक्षपदाबाबत काही ठोस निर्णय होतो का, याबद्दल उत्सुकता आहे. 

मुंबईच्या काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदासाठीही मिलिंद देवरा यांनी तरुण शिलेदारांची नावं सुचवली होती. परंतु, त्यांनी दिलेली तीनही नावं बाजूला करत, काँग्रेसने माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. 

Web Title: Sachin Pilot and Jyotiraditya Scindia can provide strength to congress; says milind deora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.