India US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ धोरणामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी अलीकडेच जवळपास सर्वच देशांमधून होणाऱ्या आयातीवर शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारत, चीन आणि युरोपियन युनियन सारख्या मोठ्या देशांचा समावेश आहे. दरम्यान, अमेरिकेच्या निर्णयावर भारताने सुरुवातीपासूनच सौम्य प्रतिक्रिया दिली आहे.
एका खाजगी टीव्ही चॅनेलच्या कार्यक्रमात बोलताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी पहिल्यांदाच अमेरिकेच्या टॅरिफ निर्णयावर थेट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, इतक्यात अमेरिकन शुल्काच्या परिणामाचे मूल्यांकन करणे खूप घाईचे ठरेल. परंतु भारताने वर्षाच्या अखेरीस अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करार (BTA) करण्याची धोरणात्मक योजना आखली आहे.
लवकरच चर्चा होईल आणि...जयशंकर पुढे म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेसोबत व्यापार करारासाठी तत्वतः करार करणारा भारत हा कदाचित एकमेव देश आहे. आम्ही निर्णय घेतला आहे की, या मुद्द्यावर ट्रम्प प्रशासनाशी लवकरच चर्चा केली जाईल आणि या वर्षाच्या अखेरीस बीटीएवरील चर्चा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
प्रतिक्रिया देण्याची घाई नकोजयशंकर यांनी असेही नमूद केले की, भारताने या प्रकरणावर अतिशय संतुलित आणि विचारशील प्रतिसाद दिला आहे. त्याचा प्रत्यक्ष परिणाम काय होईल, हे आम्हाला अद्याप माहित नाही. त्यामुळेच आम्ही घाईघाईने त्यावर प्रतिक्रिया देणार नाही. आम्ही ठोस चर्चा आणि कराराकडे वाटचाल करत आहोत, असेह त्यांनी स्पष्ट केले.
२ एप्रिल रोजी ट्रम्प यांनी 'मुक्ती दिन' घोषित केला आणि सांगितले की अमेरिका आता त्याच्या बहुतेक व्यापारी भागीदारांकडून किमान १० टक्के कर वसूल करेल. ज्या देशांसोबत अमेरिकेची व्यापार तूट आहे त्यांच्यासाठी हा दर आणखी जास्त असू शकतो. या निर्णयामुळे अमेरिकेत महागाई वाढण्याची आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे.