Russia vs Ukraine War: ...तर त्यांना थेट संपवून टाकू; संतापलेल्या पुतीन यांची आपल्याच नागरिकांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 19:49 IST2022-03-17T19:47:07+5:302022-03-17T19:49:58+5:30
Russia vs Ukraine War: युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू असताना पुतीन यांची रशिन नागरिकांना उघड धमकी

Russia vs Ukraine War: ...तर त्यांना थेट संपवून टाकू; संतापलेल्या पुतीन यांची आपल्याच नागरिकांना धमकी
मॉस्को: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन तीन आठवडे उलटले आहेत. रशियन सैन्याकडून युक्रेनच्या शहरांवर हल्ले सुरुच आहेत. युक्रेनचं लष्करदेखील रशियाला कडवी झुंज देत आहे. रशियाच्या आक्रमणाविरोधात जगभरात संताप आहे. अनेक राष्ट्र प्रमुखांनी रशियावर टीकेची झोड उठवली. रशियातील शेकडो लोकही आपल्याच सरकारविरोधात रस्त्यावर उतरले. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन संतापले आहेत.
माझ्या निर्णयाच्या विरोधात उभे राहिलात, तर संपवून टाकेन, अशी थेट धमकीच पुतीन यांनी विरोध करणाऱ्या नागरिकांना दिली आहे. 'जे लोक अमेरिका आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी काम करण्याचा प्रयत्न करतील, अशी देशद्रोही लोकांना रशियातून 'साफ' करण्यात येईल. रशियन लोक देशद्रोही आणि देशभक्तांना ओळखण्यात सक्षम आहेत,' असं पुतीन म्हणाले.
पाश्चिमात्य देश रशियाला उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप पुतीन यांनी केला. युक्रेनमध्ये शिरलेलं रशियन सैन्य आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडेल. ते आपलं लक्ष्य साध्य करतील. पाश्चिमात्य देश रशियाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. रशियाला इतरांवर अवलंबून कसा राहील, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असं पुतीन म्हणाले. जगभरातील देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे रशियामध्ये महागाई आणि बेरोजगारी वाढत असल्याची कबुली यावेळी त्यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून रशियात आंदोलनं होत आहेत. पुतीन यांनी घेतलेला युद्धाचा निर्णय अनेकांना रुचलेला नाही. काही दिवसांपूर्वीच एका वृत्तवाहिनीच्या संपादकानं लाईव्ह शो सुरू असताना 'युद्ध नको' असा फलक दाखवला. रशियन सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या अजेंड्यावर सडकून टीका केली. याशिवाय विविध क्षेत्रातील लोक पुतीन यांच्या युद्धाच्या निर्णयाला विरोध करत आहेत.