Russia Ukraine War: 52 लाखांच्या मोहात फसला, रशियात गेलेला हरयाणाचा २१ वर्षीय अनुज थेट युद्धभूमीवर अडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 11:44 IST2025-12-08T11:42:14+5:302025-12-08T11:44:30+5:30
Indian Student trapped in Russia Ukrain War: हरयाणातील अनुज शिक्षण घेण्यासाठी रशियात गेला. त्यासाठी त्याने एजंटला ६ लाख रुपये दिले. पण, तिथे गेल्यानंतर ५२ लाख रुपये मिळवण्याच्या मोहाने त्याला थेट युद्धभूमीवर लढण्यासाठी ढकलले.

Russia Ukraine War: 52 लाखांच्या मोहात फसला, रशियात गेलेला हरयाणाचा २१ वर्षीय अनुज थेट युद्धभूमीवर अडकला
२१ वर्षांचा अनुज शिक्षणासाठी व्हिसा मिळाल्यानंतर रशियात गेला. याचवर्षी म्हणजे मे २०२५ मध्ये एका एजंटला सहा लाख रुपये देऊन अनुज रशियामध्ये पोहोचला. रशियात जाऊन नोकरी करून कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढायचं असं ठरवून तो तिथे गेला, पण नंतर जे घडले ते खूपच धक्कादायक होतं. रशियात पोहोचलेल्या एका एजंटने अनुजला ५२ लाख रुपये देतो असे सांगितले. याच मोहात अनुज अडकला. त्याला कामासाठी म्हणून १० दिवसांचे प्रशिक्षण दिले गेले, त्यानंतर थेट त्याला युक्रेनविरोधात सुरू असलेल्या युद्धात लढण्यासाठी पाठण्यात आले. १३ ऑक्टोबरपासून अनुजची कोणतीही माहिती त्याच्या कुटुंबीयांना मिळालेली नाही.
हरयाणातील करनाल जिल्ह्यात असलेल्या घरौंदा गावातील अनुजचे कुटुंबीय सध्या हादरून गेले आहेत. कुटुंबाला आर्थिक विंवचनेतून बाहेर काढण्यासाठी अनुज ६ लाख रुपये एजंटला देऊन गेला होता. तिथे गेल्यानंतर अनुज एका जीममध्ये कामाला लागला होता. तिथेच एका एजटंने अनुजसह इतर काही तरुणांना भुलवले आणि तिथेच ते फसले.
५२ लाख, १० दिवसांचे प्रशिक्षण आणि युद्ध
एका एजंटने त्यांना रशियाच्या लष्करात भरती होण्याची ऑफर दिली. पण, त्यांनी सुरुवातीला त्याला नकार दिला. त्यानंतर एजंटने पुन्हा त्यांना मनवले. ५२ लाख रुपये देणार असे सांगितल्यानंतर अनुज आणि इतर काही तरुण कामासाठी तयार झाले. त्यांना सांगण्यात आले की, टप्प्याटप्प्याने ही रक्कम खात्यामध्ये जमा केली जाईल.
५२ लाख रुपये मिळणार म्हणून अनुज भरती होण्यास तयार झाला. त्यानंतर अनुज आणि इतर तरुणांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. दहा दिवस प्रशिक्षण देण्यात आले आणि थेट युक्रेनविरोधात लढण्यासाठी पाठवण्यात आले.
अनुजच्या कुटुंबीयांनी काय सांगितले?
अनुजच्या कुटुंबीयांनी सांगितले की, १३ ऑक्टोबर रोजी अनुजसोबत शेवटचे बोलणे झाले होते. अनुज म्हणाला की, आम्हाला रेड झोन म्हणजेच फ्रंट लाईनवर पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर आतापर्यंत त्याच्याशी कोणतेही बोलणे झालेले नाही. अनेक तरुण भारतात परत आले आहेत, जे आधीपासूनच तिथे अडकलेले होते. अजूनही काही तरुण तिथे अडकलेले असून, त्यात अनुजही आहे आणि तो सध्या बेपत्ता आहे.
अनुजच्या कुटुंबीयांचा मदतीसाठी टाहो
अनुजला परत भारतात पाठवा, असे आता त्याचे कुटुंबीय म्हणत आहेत. कुटुंबीयांनी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला. आम्ही आंदोलन केले आणि मेलही पाठवले आहे. पण अजूनही अनुजबद्दल कोणतेही माहिती मिळालेली नाही. भारताचे रशियासोबत चांगले संबंध आहेत, त्यामुळे रशिया भारत सरकारचे ऐकेल अशी आम्हाला आशा आहे, असे अनुजच्या कुटुंबीयांना वाटते.