उत्तराखंड विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान आज कामकाजाच्या सुरुवातीलाच जोरदार गोंधळ झाला. कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, पंचायत निवडणुकीत झालेला गोंधळ यावर विशेष चर्चेची मागणी करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज वारंवार स्थगित करावे लागले.
आज विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान ११ ते १२.३० या वेळेत विरोधकांनी वारंवार गोंधळ घातला. या दरम्यान, विरोधी पक्षातील काही सदस्यांनी थेट हौद्यात धाव घेत गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी काही आमदारांनी सचिवांचं टेबल उचलून उटलं केलं. तसेच टेबलावरचे माईकही उखडून काढले. त्यामुळे संतप्त झालेल्या विधानसभा अध्यक्ष सभागृहातून निघून गेल्या.
विरोधी पक्ष राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, पंचायत निवडणकुती झालेला गोंधळ यावरून चर्चेची मागणी करत होते. पंचायत निवडणुकीत सरकारच्या इशाऱ्यावर कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवले गेले, असा आरोप काँग्रेसचे आमदार प्रीतम सिंह यांनी केला.