बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:35 IST2025-11-06T14:35:03+5:302025-11-06T14:35:41+5:30
Bihar Election Voting Update: बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली, मतदानावेळी दोन मोठ्या घटना घडल्या आहेत.

बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आज सुरुवात झाली आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ४२.३ टक्के मतदान झाले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत मतदान सुरु असताना दोन वेगवेगळ्या घटनांत बिहारचे उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर तसेच सीपीएमच्या उमेदवारावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय सिन्हा यांच्या ताफ्यावर लखीसराय येथे हल्ला करण्यात आला आहे. सिन्हा यांनी थेट राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांना जबाबदार धरले आहे. त्यांनी या घटनेचा उल्लेख "आरजेडीच्या गुंडांचे कारस्थान" असा करत त्यांच्यावर सडकून टीका केली. "लोकशाहीमध्ये अशा प्रकारची अराजकता आणि गुंडगिरी अजिबात स्वीकारली जाणार नाही," असे सिन्हा यांनी सांगितले. निवडणूक आयोगाकडे आणि प्रशासनाकडे या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन, हल्लेखोरांवर सख्त कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दुसऱ्या घटनेत छपरा येथे सीपीएम उमेदवार मांझीचे आमदार सत्येंद्र यादव यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. यादव यांना मारहाणही करण्यात आल्याचे समोर येत आहे. सारण जिल्ह्यातील मांझी विधानसभा मतदारसंघातील जैतपूर गावातील बूथ क्रमांक ४१, ४२, ४३ आणि ४४ वर काही लोकांनी यादव यांच्यावर हल्ला केला. तसेच गाडीची तोडफोडही करण्यात आली आहे. माहिती मिळताच डीएसपी आणि इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दौडपूर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.