आंतरजातीय विवाहाला आरएसएसचा विरोध नाही- भागवत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 06:41 IST2018-09-19T23:37:34+5:302018-09-20T06:41:07+5:30
आंतरजातीय विवाह हा संबंधित स्त्री-पुरुषातील परस्परसंमतीचा विषय आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी व्यक्त केले.

आंतरजातीय विवाहाला आरएसएसचा विरोध नाही- भागवत
नवी दिल्ली : आंतरजातीय विवाहाला रा. स्व. संघाचा विरोध नाही. असा विवाह हा संबंधित स्त्री-पुरुषातील परस्परसंमतीचा विषय आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी व्यक्त केले.
‘भारताचे भविष्य -संघाचा दृष्टिकोन’ या विषयावरील तीन दिवसांच्या परिषदेच्या शेवटच्या दिवशी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना भागवत यांनी सविस्तर उत्तरे दिली. ते म्हणाले की, संघस्वयंसेवकांनीच आंतरजातील विवाह केल्याची असंख्य उदाहरणे आहेत. गोरक्षकांच्या मारहाणीत काहींचे बळी गेल्याबद्दलच्या प्रश्नावर ते उत्तरले की, गोरक्षण आवश्यकच आहे. पण त्याच्या नावाखाली हिंसाचार संघाला मान्य नाही. हिंसा करून विरोध करणे चुकीचे आहे. काश्मीरविषयक ३५ अ व ३७० कलमांना संघाचा विरोध आहे आणि आमचा इंग्रजीसह कोणत्याही भाषेला विरोध नाही, असेही ते म्हणाले.
भारतात राहाणारा प्रत्येक जण हा हिंदूच आहे असे सांगून भागवत म्हणाले की, ओळख व राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीनेही तो हिंदू आहे, असे आमचे म्हणणे आहे. मात्र काही जण तसे सांगायला कचरतात. प्रत्यक्षात हे सारे आपलेच लोक आहेत. रा. स्व. संघाचा बेकायदेशीररित्या व अनुचित पद्धतीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराला ठाम विरोध आहे, असेही मोहन भागवत यांनी नमूद केले.