भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 19:14 IST2025-08-28T19:13:04+5:302025-08-28T19:14:19+5:30

RSS-BJP: 'राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार, प्रत्येक सरकारशी आमचा चांगला समन्वय आहे.'

RSS-BJP: There is no dispute or difference between BJP and RSS; RSS chief Mohan Bhagwat clarifies | भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती

भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती

RSS-BJP: राष्ट्रीय स्वायंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष समारंभाच्या आज(दि.२८) तिसऱ्या दिवशी संघ प्रमुख मोहन भागवत यांनी संघावर उपस्थित करण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तर दिली. यातील एक प्रश्न होता की, RSS आणि भाजपमध्ये मतभेद आहेत का? या प्रश्नाचे उत्तर देताना सरसंघचालक म्हणाले, आरएसएस आणि भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. त्यांनी स्पष्ट केले की, संघाचा केंद्र आणि राज्य सरकारांशी चांगला समन्वय आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी कार्यक्रमातून मोहन भागवत यांनी स्पष्ट केले की, 'संघ आणि भारतीय जनता पक्षात कोणताही वाद नाही. संघ कोणत्याही मुद्द्यावर सरकारला सल्ला देऊ शकतो, परंतु अंतिम निर्णय भाजपचाच असतो. राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार, प्रत्येक सरकारशी आमचा चांगला समन्वय आहे. परंतु व्यवस्थेत काही अंतर्गत विरोधाभास आहेत. ही तीच व्यवस्था आहे जी ब्रिटिशांनी राज्य करण्यासाठी निर्माण केली होती. म्हणून, त्यात सुधारणा करण्याची गरज आहे.' 

'आम्हाला काही काम करायचे आहे, परंतु खुर्चीवर बसलेली व्यक्ती १००% आपल्या बाजूने असली तरी त्याला काम करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. तो ते करू शकेल की नाही, हे त्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. यात कोणताही संघर्ष नाही. मतभेद असू शकतात, पण मनभेद नाही. सर्व अफवा आहेत. दोघांचेही ध्येय एकच आहे, ते म्हणजे देशाचे कल्याण,' असेही मोहन भागवतांनी यावेळी स्पष्ट केले.

नवीन शिक्षण धोरण आणणे आवश्यक 
संघ प्रमुख मोहन भागवत यांनी यावेळी देशातील शिक्षणावरही भाष्य केले. ते म्हणाले, 'नवीन शिक्षण धोरणात पंचकोशी शिक्षणाची म्हणजेच पाच-स्तरीय समग्र शिक्षणाची तरतूद आहे. आपल्या देशाचे शिक्षण अनेक वर्षांपूर्वी नामशेष झाले. या देशावर राज्य करण्यासाठी नवीन शिक्षणाची निर्मिती करण्यात आली. परंतु आज आपण स्वतंत्र आहोत, म्हणून अशा शिक्षणाची आवश्यकता आहे, जे केवळ राज्य चालवण्याच्या दृष्टीनेच नव्हे, तर लोकांच्या कल्याणासाठी असला पाहिजे. 

कोणतीही भाषा शिकण्यात काही अडचण नाही
'आपण ब्रिटिश नाही. आपल्याला ब्रिटिश व्हायचे नाही, पण ही एक भाषा आहे आणि भाषा शिकण्यात कोणतीही अडचण नाही. नवीन शिक्षण धोरणात पंचकोशी शिक्षणाची जी व्यवस्था करण्यात आली आहे, ती हळूहळू पुढे जाईल. संगीत, नाटक यासारख्या विषयांमध्ये रस निर्माण केला पाहिजे, परंतु काहीही सक्तीचे करू नये. वैदिक काळातील शिक्षणाच्या ६४ कलांमधून घेता येतील असे विषय घेतले पाहिजेत. गुरुकुल आणि आधुनिक शिक्षण एकत्र आणले पाहिजे. आधुनिक शिक्षण गुरुकुल पद्धतीशी जोडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,' असेही त्यांनी यावेळी म्हटले.

Web Title: RSS-BJP: There is no dispute or difference between BJP and RSS; RSS chief Mohan Bhagwat clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.