शेतकऱ्याच्या खात्यात १०,०१,३५,६०,१३,९५,००० रुपये; बँकेकडून अकाउंट फ्रीज, सायबर सेलमध्येही तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 06:48 IST2025-05-06T06:48:47+5:302025-05-06T06:48:59+5:30
हाथरस : उत्तरप प्रदेशातील हाथरसच्या मधील एका शेतकऱ्याच्या बँक खात्यात अचानक अब्जावधी रुपये आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सादाबाद ...

शेतकऱ्याच्या खात्यात १०,०१,३५,६०,१३,९५,००० रुपये; बँकेकडून अकाउंट फ्रीज, सायबर सेलमध्येही तक्रार
हाथरस : उत्तरप प्रदेशातील हाथरसच्या मधील एका शेतकऱ्याच्या बँक खात्यात अचानक अब्जावधी रुपये आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सादाबाद तालुक्यातील नगला दुर्जिया गावातील शेतकऱ्याच्या खात्यात १० नील १ खरब ३५ अब्ज ६० कोटी १३ लाख ९५ हजार रुपये जमा झाले. इतकी मोठी रक्कम पाहून शेतकऱ्याला धक्काच बसला. त्याने घाईघाईत या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.
आता शेतकऱ्याचे खाते फ्रीज करून हा प्रकार नेमका कशामुळे घडला, याचा तपास सुरू आहे. एवढी मोठी रक्कम नेमकी कशी आली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. तांत्रिक चुकीमुळे हे घडले की सायबर चोरट्यांंनी हे केले, याचा तपास सुरू आहे. (वृत्तसंस्था)
नेमके काय घडले? तांत्रिक चुकीमुळे की सायबर फसवणूक?
नगला दुर्जिया गावातील शेतकरी अजित सिंह यांच्या बाबतीत हा प्रकार घडला. अजितसिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, २४ एप्रिल रोजी त्यांच्या एअरटेल पेमेंट बँकेच्या खात्यातून १८०० रुपये गायब झाले होते. त्यामुळे ते चिंतेत होते. पण दुसऱ्या दिवशी २५ एप्रिल रोजी बॅलन्स तपासला तेव्हा त्याचे डोळे विस्फारले. खात्यात १०,०१,३५,६०,१३,९५,००० इतके रुपये जमा झाले होते. यावर त्यांचा विश्वास बसला नाही.
अजित सिंह यांनी याची माहिती मई पोलिस ठाण्यात दिली. अजित सिंह यांच्या मते हा प्रकार कुणीतरी सायबर गुन्हेगाराने केला असावा. त्यांच्या खात्यातून पैसे आधी कापले गेले आणि नंतर दुसऱ्याच दिवशी मोठी रक्कम जमा करण्यात आली. हे सर्व त्यांना फसवण्यासाठी केले जात आहे, असा त्यांचा आरोप आहे. त्यांनी या प्रकाराची तक्रार एअरटेल पेमेंट बँकेच्या कस्टमर केअरवर केली आहे. एअरटेल पेमेंट बँकेने सध्या त्यांचे खाते फ्रीज केले आहे. तांत्रिक चुकीमुळे हे घडले का, याचा तपास केला जाणार आहे. अजित सिंह यांनी सायबर सेलमध्येही ऑनलाइन तक्रार केली आहे.