RPF jawan shot and killed three milkman | आरपीएफ जवानाने गोळ्या झाडून केली दूधविक्रेत्यासह तिघांची हत्या

आरपीएफ जवानाने गोळ्या झाडून केली दूधविक्रेत्यासह तिघांची हत्या

रामगढ : थकलेल्या बिलाची १२०० रुपयांची रक्कम न मिळाल्याने दूध देण्याचे बंद करणारा विक्रेता, त्याची पत्नी, गर्भवती मुलगी अशा तिघांची रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) एका जवानाने शनिवारी रात्री गोळ््या घालून हत्या केली. त्यात दुधविक्रेत्याची मुलगी व मुलगा जखमी झाले आहेत. ही भीषण घटना झारखंडमधील रामगढ जिल्ह्यातल्या बारकाकना येथे घडली.
रामगढचे पोलीस अधीक्षक प्रभातकुमार यांनी सांगितले की, आरपीएफ जवान पवनकुमार सिंह याने शनिवारी रात्री आपल्या जवळील सर्व्हिस पिस्तुलने रेल्वे हमाल अशोक राम व त्याच्या कुटुंबीयांवर गोळीबार केला. त्यात अशोक राम (५५), त्याची पत्नी लीलावती (५२), गर्भवती मुलगी मीनादेवी (२७) हे जागीच ठार झाले तर मुलगी सुमनदेवी (२५), चिंटूराम (२०) हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींना उपचारांसाठी रांची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बारकाकना येथे रेल्वे वसाहतीत अशोक राम त्यांच्या कुटुंबीयांसमवेत राहात होते. आरपीएफ जवान पवनकुमार सिंह हा बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील कारथ गावचा मूळ रहिवासी असून त्याची बारकाकना रेल्वे स्थानक पोलीस चौकीमध्ये नियुक्ती झाली होती. गोळीबाराच्या घटनेनंतर तो फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
अशोक राम याचा आणखी एक मुलगा बिट्टू राम याने पत्रकारांना सांगितले की, रेल्वेमध्ये हमाल म्हणून काम करण्याबरोबरच अशोक राम हे दूधविक्रीचाही व्यवसाय करत. आरपीएफ जवान पवनकुमार सिंह हा त्यांच्याकडून दररोज दूध विकत घेत होता. मात्र त्याने दुधाच्या बिलाचे १२०० रुपये थकविल्याने त्याला अशोक राम यांनी शनिवारपासून दूध देणे बंद केले. त्यामुळे संतप्त झालेल्या पवनकुमारने अशोक राम यांच्या घरी जाऊन त्यांच्यासह कुटुंबीयांवर गोळ््या झाडल्या. (वृत्तसंस्था)

स्थानिकांचे आंदोलन
अशोक राम व कुटुंबीयांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी रामगढ-रांची महामार्गावरील वाहतूक रविवारी काही काळ रोखून धरली होती तसेच रेलरोको आंदोलनही केले. फरारी आरपीएफ जवानाला तत्काळ अटक करावी, अशोक राम यांच्या वारसदाराला रेल्वेच्या नोकरीत सामावून घ्यावे तसेच योग्य भरपाई द्यावी अशा मागण्या या नागरिकांनी केल्या.

Web Title:  RPF jawan shot and killed three milkman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.