Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 16:10 IST2025-11-15T16:06:41+5:302025-11-15T16:10:47+5:30
Rohini Acharya Latest News: तेजप्रताप यादव यांच्यासोबत लालू प्रसाद यादव यांनी संबंध तोडले. आता त्यांच्या मुलीनेही कुटुंबासोबतचे संबंध तोडत असल्याचे जाहीर केले आहे.

Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
"मी राजकारण सोडत आहे आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", अशी घोषणा करत लाल प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी बिहारराजकारणात खळबळ उडवून दिली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर रोहिणी आचार्य यांनी हे जाहीर केले असून, यादवांच्या कुटुंबाला दुसरा तडा गेला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांच्यासोबतचे संबंध तोडले होते. तेज प्रताप यादव यांनी स्वतंत्र पक्ष काढून बिहार विधानसभा निवडणूक लढवली. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर असाच एक धक्का लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबाला लागला आहे.
वडील लालू प्रसाद यादव यांना स्वतःची किडनी देणाऱ्या रोहिणी आचार्य यांनी आता यादव कुटुंबासोबतचे संबंधच तोडले आहेत. राजकीय संघर्ष यादव कुटुंबापर्यंत पोहोचला असून, त्यातून आता तडे जाताना दिसत आहे.
संजय यादव आणि रमीज यांची हीच इच्छा होती
लालू प्रसाद यादव यांची छोटी मुलगी आणि तेजस्वी यादव यांची बहीण रोहिणी आचार्य यांनी एक पोस्ट केली आहे.
रोहिणी आचार्य म्हणाल्या, "मी राजकारण सोडत आहे आणि मी माझ्या कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे. संजय यादव आणि रमीज यांनी मला हेच करायला सांगितले होते. सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेत आहे."
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाला मोठा फटका बसला आहे. या निकालानंतर थेट लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबातच फूट पडली आहे. आधी तेजप्रताप यादव आणि आता रोहिणी आचार्य हे कुटुंबापासून वेगळे झाले आहेत.
रोहिणी आचार्य यांच्या रडारवर कोण?
लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्या जवळच्या लोकांवरच निशाणा साधला आहे. राज्यसभा खासदार संजय यादव यांच्यावर आरोप केला आहे. संजय यादव हे राष्ट्रीय जनता दलाचे निवडणूक रणनितीकार आहेत.
रोहिणी आचार्य सातत्याने त्यांची नाराजी व्यक्त करत आल्या आहेत. "मी एक मुलगी आणि बहीण म्हणून आपले कर्तव्य पार पाडले आहे. पुढेही जबाबदारी पार पाडत राहील. मला कोणत्याही पदाची लालसा नाही. मला कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाहीये. पण, माझा आत्मसन्मान सर्वोच्च असेल", रोहिणी आचार्यांनी सप्टेंबरमध्ये केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते.