भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादी अड्ड्यांचे जबर नुकसान झाले होते. तसेच या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले होते. दरम्यान, या कारवाईनंतर खवळलेल्या पाकिस्ताननेभारतावर प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केली आहे. काल रात्री पाकिस्तानी सैन्याने जम्मूपासून भूजपर्यंत विविध भागात केलेले हल्ले हाणून पाडल्यानंतर आता आज पाकिस्तानने पुन्हा एकदा आगळीक केली आहे. पाकिस्तानने जम्मू विमानतळावर रॉकेट हल्ला केला आहे. तसेच सांबा परिसरात पाकिस्तानकडून भीषण गोळीबार सुरू आहे.
पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र हल्ल्याचे संकेत मिळताच भारताने ए-४०० प्रणाली सक्रिय केली असून, पाकिस्तानने जम्मू आणि सांबाच्या दिशेने डागलेली क्षेपणास्त्रे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. त्याशिवाय सांबा आणि अखनूर क्षेत्रात नियंत्रण रेषेपलीकडून पाकिस्तानने भीषण गोळीबार सुरू केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आरएसपुरा विभागात ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. तसेच जम्मू शहरामध्ये मोबाईल नेटवर्क जॅम झाले आहेत. हल्ल्याचे सायरन वाजत आहेत. तसेच सतवारी कॅम्पवरही हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.