ED Robert Vadra: काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढणार आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने(ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात रविवारी(दि.१०) वाड्रांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. वाड्रा यांनी दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपयांचे बेकायदेशीर उत्पन्न मिळवले आणि ती मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि व्यावसायिक कर्जांची परतफेड करण्यासाठी वापरली, असा त्यांच्यावर आरोप आहे.
ईडीच्या आरोपपत्रानुसार, रॉबर्ट वाड्रा यांना दोन कंपन्यांकडून ५८ कोटी रुपयांचे बेकायदेशीर उत्पन्न मिळाले, जे कथित गुन्हेगारी कारवायांशी संबंधित होते. त्यांनी ही रक्कम रिअल इस्टेट खरेदी करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी आणि त्यांच्या विविध कंपन्यांचे कर्ज फेडण्यासाठी वापरल्याचा आरोप आहे.
दोन कंपन्यांद्वारे मिळालेले बेकायदेशीर उत्पन्नईडीच्या आरोपपत्रात असेही म्हटले आहे की, एकूण ५८ कोटी रुपये रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे आले, जे दोन मार्गांनी आले आहे. यापैकी ५ कोटी रुपये ब्लू ब्रीझ ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड (बीबीटीपीएल) द्वारे आणि ५३ कोटी रुपये स्काय लाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड (एसएलएचपीएल) द्वारे हस्तांतरित केले गेले.
जमीन घोटाळ्यातही अडचणी वाढल्यादुसरीकडे, गुरुग्राममधील शिकोहपूर येथील २००८ च्या जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राऊस अव्हेन्यू कोर्टाचे विशेष ईडी न्यायाधीश सुशांत चगोत्रा यांनी आरोपपत्राची दखल घेण्यापूर्वी वाड्रा यांना नोटीस बजावली आहे. न्यायालयाने त्यांना २८ ऑगस्ट रोजी हजर राहून त्यांची बाजू मांडण्यासाठी आणि ईडीच्या युक्तिवादांवर चर्चा करण्यासाठी समन्स बजावले आहे.