शस्त्राचा धाक दाखवून कारचालकाची लूट
By Admin | Updated: January 6, 2015 00:08 IST2015-01-05T22:04:21+5:302015-01-06T00:08:41+5:30
मते नर्सरीजवळील रविवारची घटना : चौघांना पोलीस कोठडी

शस्त्राचा धाक दाखवून कारचालकाची लूट
मते नर्सरीजवळील रविवारची घटना : चौघांना पोलीस कोठडी
नाशिक : कारला पाठीमागून दुचाकीने धडक देत कुरापत काढून शस्त्राचा धाक दाखवित लूट केल्याची तसेच कारच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना रविवारी सकाळी मते नर्सरीजवळ घडली़ या प्रकरणी सूरज ढवळे, सतीश चौरे, सचिन पगार व नानासाहेब ठपाळे या चौघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास नवीन आय ट्वेन्टी कारने एक कुटुंबीय मते नर्सरीजवळील रस्त्याने जात होते़ त्यावेळी त्यांना पाठीमागून आलेल्या डिस्कव्हर दुचाकीने (एमएच १५, सीआर- ६७०९) धडक दिली़ दुचाकीवरील संशयित सूरज जगन ढवळे, सतीश शिवाजी चौरे, सचिन साहेबराव पगार (रा़ निर्मला कॉन्व्हेंटजवळ, गंगापूररोड) व नानासाहेब बापूराव ठपाळे यांनी कुरापत काढून भांडण सुरू केले़ यानंतर कारवर दगडफेक करून कारचालकास मारहाण करण्यास सुरुवात केली़ यावेळी फिर्यादीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता संशयितांपैकी एकाने दुचाकीच्या डिकीतून गुप्ती काढून जिवे मारण्याची धमकी देत खिशातील पाच हजार रुपये काढून घेतले़ संशयितांनी केलेल्या दगडफेकीत कारची काच फुटून तीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़
दरम्यान, गंगापूर पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या चौघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ (प्रतिनिधी)