एसबीआय बँकेवर दरोडा; २१ कोटींचा ऐवज लुटला, २० किलो सोनेही घेत काढला पळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 08:14 IST2025-09-18T08:14:10+5:302025-09-18T08:14:10+5:30
दरोडेखोरांचे महाराष्ट्राच्या दिशेने पलायन

एसबीआय बँकेवर दरोडा; २१ कोटींचा ऐवज लुटला, २० किलो सोनेही घेत काढला पळ
विजयपुरा : कर्नाटक राज्यातील विजयपुरा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) शाखेत मंगळवारी संध्याकाळी पाच सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. एकूण सुमारे २१ कोटी रुपयांची चोरी झाली असून यामध्ये १.०४ कोटी रुपये रोख रक्कम आणि २० किलो सोनं (सुमारे २० कोटी रुपये किमतीचे) यांचा समावेश आहे. या दरोडेखोरांनी महाराष्ट्राच्या दिशेने पलायन केल्याचा पोलिसांना संशय आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण बी. निंबारगी यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले व तपास सुरू केला. दरोडेखोरांनी लष्करी गणवेशासारखे कपडे घातले होते व तोंडावर मास्क लावले. मंगळवारी ही घटना संध्याकाळी ६:३० ते ७:२० या वेळेत घडली. या पाच दरोडेखोरांतील तीन जण बँकेच्या आत गेले आणि दोन जण बाहेर उभे राहिले. दरोडेखोरांनी बँकेतील मॅनेजर, कॅशिअर व इतर कर्मचाऱ्यांना हातातील शस्त्राचा धाक दाखविला. (वृत्तसंस्था)
चार महिन्यांत दुसरी घटना
विजयपुरा जिल्ह्यातील गेल्या चार महिन्यांतील हा दुसरा मोठा बँक दरोडा आहे. याआधी २५ मे रोजी, विजयपुरा जिल्ह्यातील माणगुली गावातील कॅनरा बँकेत ५३ कोटींचे सोने आणि ५.२० लाख रुपयांची रोख रक्कम चोरण्यात आली. त्या प्रकरणात १५ आरोपींना अटक करण्यात आली होती.
हातपाय बांधले अन्...
कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधले. त्यानंतर बँकेतील रोख रक्कम आणि सोने बॅगमध्ये भरून, बँकेला बाहेरून कडी लावून ते पसार झाले.
या वेळी गोळीबारही करण्यात आला. ही घटना घडली तेव्हा बँकेत सुरक्षा रक्षक नव्हता.