25 किलो वजनाची तिजोरी घेऊन चोर लंपास, आतमध्ये सापडली फक्त 100 रुपयांची नोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 13:25 IST2018-02-28T13:25:30+5:302018-02-28T13:25:30+5:30
तिजोरीवर हात साफ करत मोठी चोरी करण्याच्या उद्देशाने 25 किलो वजनाचं लॉकर घेऊन पळालेल्या चोरांची फजिती झाल्याची एक हास्यासद घटना समोर आली आहे

25 किलो वजनाची तिजोरी घेऊन चोर लंपास, आतमध्ये सापडली फक्त 100 रुपयांची नोट
बंगळुरु - डोंगर पोखरुन उंदीर बाहेर काढला ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. पण अगदी या म्हणीला साजेशी घटना बंगळुरुत पहायला मिळाली आहे. तिजोरीवर हात साफ करत मोठी चोरी करण्याच्या उद्देशाने 25 किलो वजनाचं लॉकर घेऊन पळालेल्या चोरांची फजिती झाल्याची एक हास्यासद घटना समोर आली आहे. सोना-याच्या घरुन तिजोरी घेऊन पळालेल्या चोरांनी आतमध्ये मोठी रक्कम आणि दागिने असतील या अपेक्षेने तिजोरी फोडली पण त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं. कारण तिजोरीत 100 रुपयांची नोट सोडून काहीच नव्हतं. जे सी नगर पोलिसांना सात जणांच्या टोळीला अटक केल्यानंतर ही हास्यास्पद घटना समोर आली.
टोळीत सामील असणारे सर्व चोर सुरक्षा रक्षक म्हणून शहरभरातील ऑफिस आणि अपार्टमेंटमध्ये काम करत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून दागिन्यांसहित सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
20 फेब्रुवारीला चोरांनी सोने व्यापारी भाटिया यांच्या घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तिजोरी उघडत नव्हती. अखेर 25 किलो वजनाची तिजोऱी घेऊनच त्यांनी पळ काढला.
आरोपींपैकी एकाची बहिण भाटिया यांच्या घरात घरकाम करते. तिने आपल्या भावाला कुटुंबातील सगळेजण चार दिवसांसाठी बाहेर चालले असल्याची माहिती दिली होती. हीच संधी साधत त्यांनी चोरी करण्याचा डाव आखला होता. पण त्यांची चांगलीच फजिती झालेली पहायला मिळाली.