मोदींनी शुभारंभ केलेली रो-रो सेवा 'टेक्निकल' कारणांमध्ये अडकली, अजूनही सुरूवात नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 18:05 IST2017-10-25T18:04:26+5:302017-10-25T18:05:14+5:30
गुजरात निवडणूक जवळ येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात कार्यक्रमांचा धडाका लावला. गुजरात सरकारने 20 ऑक्टोबरला वृत्तपत्रात, रो-रो सेवा मंगळवारी (24 ऑक्टोबर) सामान्य जनतेसाठी सुरू होईल अशी जाहिरात दिली होती.

मोदींनी शुभारंभ केलेली रो-रो सेवा 'टेक्निकल' कारणांमध्ये अडकली, अजूनही सुरूवात नाही
गांधीनगर - गुजरात निवडणूक जवळ येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात कार्यक्रमांचा धडाका लावला. गुजरात सरकारने 20 ऑक्टोबरला वृत्तपत्रात, रो-रो सेवा मंगळवारी (24 ऑक्टोबर) सामान्य जनतेसाठी सुरू होईल अशी जाहिरात दिली होती. रविवारी पंतप्रधान मोदींनी सौराष्ट्राला दक्षिण गुजरातशी जलमार्गाने जोडणा-या ‘रोल ऑन-रोल ऑफ’ या घोघा ते दाहेजदरम्यानच्या 650 कोटी आपल्या स्वप्नातील नौका सेवेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ केला. त्यावेळी मंगळवारपासून ही सेवा सुरू होईल अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक परवानग्या न मिळाल्याने ही सेवा अजून सुरू झालेली नाही. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर 26 ऑक्टोबरनंतर ही सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे गुजरात मॅरीटाइम बोर्डाने ही सेवा 1 नोव्हेंबरच्या आधी सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं आहे.
‘रो-रो’ नौका सेवा 24 ऑक्टोबरला सामान्य जनतेसाठी सुरू झाली नसली तरी या फेरीने घोघा ते दाहेजदरम्यान प्रवास केला. प्रवाशांनीही यामधून प्रवास केला मात्र केवळ प्रवाशांच्या मनोरंजनासाठी ही फेरी चालवण्यात आली होती.
काय आहे रो-रो सर्व्हिस...
घोघा ते दाहेजदरम्यानच्या 650 कोटी रुपये खर्चाच्या ‘रो-रो’ नौका सेवेमुळे प्रवासासोबत वाहन आणि मालाची वाहतूकही करता येणार आहे.
वेळ वाचणार-
सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातदरम्यान रस्त्याने प्रवास करण्यासाठी दहा तास लागतात. दाहेज ते घोघादरम्यानचे अंतर रस्तेमार्गे 310 किलोमीटर आहे. या जलमार्गाने हे अंतर 31 किलोमीटरवर येईल आणि वेळही कमी लागेल.
>150 मोठ्या वाहनांची वाहतूक करता येणार
>1000 लोक एकाच वेळी बोटीतून प्रवास करू शकतील
>600 रुपये सध्या या नौका सेवेचे भाडे आहे.